Saturday, December 14, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यउघड दार देवा आता...

उघड दार देवा आता…

श्रीनिवास बेलसरे

जगदीश खेबुडकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व! हुकुमी गाणी देणारे गीतकार म्हणून ते सर्वपरिचित आहेत. त्यांचे वैशिष्ट्य हे की, जुन्या तमाशापटातील एखादी चटकदार लावणी किंवा अध्यात्मिक जुगलबंदी असलेले सवाल-जवाब ऐकले की, आपल्याला खात्री असते-गाणे जगदीश खेबुडकरांनीच लिहिलेले असणार! मात्र, जेव्हा भावगीताच्या जवळ जाणारे, एखादे अतिशय भावुक प्रेमगीत ऐकले की, आपण संभ्रमात पडतो – हे गदिमांचे शब्द असतील की जगदीश खेबुडकरांचे? अनेकदा दोघांपैकी कुणीही एक त्या गाण्याचा गीतकार निघतो, इतके त्यांच्या लेखणीत साम्य आहे. खरे तर, दोघांचे ग्रामीण आणि शहरी जीवनाबद्दलचे आकलन परिपूर्ण आणि सारखे आहे!

लावणी, प्रेमगीते, भावगीतांबरोबरच त्यांनी भजनेही लिहिली. ‘आम्ही जातो अमुच्या गावा’मधील (१९६८), ‘देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा, आता उघड दार देवा’ हे असेच लोकप्रिय भक्तिगीत! ते ज्या प्रसंगासाठी लिहिले तो सिनेमातील प्रसंग पाहिला तर आश्चर्य वाटते. एक प्रामाणिक व्यावसायिक असलेले श्रीधरपंत भागीदाराकडून फसवले गेले आहेत. तो घरावर जप्ती आणण्याची धमकी देतोय. पंत मात्र विमनस्क मन:स्थिती बाजूला ठेवून देवापुढे बसून भक्तिभावाने देवपूजा करत आहेत. दुसऱ्या खोलीत, तुरुंगातून पळून आलेल्या तीन दरोडेखोरांना-संताजी (धुमाळ), धनाजी (सूर्यकांत) आणि सयाजी (गणेश सोलंकी) यांना सज्जन माणसे समजून पंतांनी घरात ठेवून घेतले आहे.

नवरा-बायको आणि त्यांची एकुलती एक मुलगी भजनात दंग झालेली पाहून दरोडेखोर श्रीधरपंतांची तिजोरी फोडण्याच्या प्रयत्न करत आहेत. आता ‘लिहा या प्रसंगावर गाणे!’ असे म्हटले तर काय लिहिणार? पण जगदीश खेबुडकर नावाच्या शब्दप्रभूने त्या प्रसंगावरही जबरदस्त गाणे लिहून किमया सिद्ध केलीच!

भक्तिभावाने सुरू असलेल्या पूजेतील प्रत्येक गोष्टीला जगदीशजींनी प्रतिकात बदलून सगळ्यांचा कथेशी सुंदर संबंध जोडून टाकला. श्रीधरपंतांचे परक्या माणसांवर सहज विश्वास टाकणे, त्यांना घरात ठेवून मानाने वागवणे, मनोभावे ईश्वरभक्ती करणे आणि एकंदरच सचोटीचा व्यवहार पाहून दरोडेखोर संभ्रमात पडतात. जरी ते सवयीमुळे तिजोरी फोडून पळून जायचे ठरवतात, तरी हे असले भजन ऐकल्यावर त्यांच्यातला माणूस लख्ख जागा होतो –

‘पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्यांची…
या ओळींपाठोपाठ जेव्हा –
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा…

अशी ओळ येते, तेव्हा लीलया कोणतीही तिजोरी उघडणाऱ्याचेही हात थरथरू लागतात. एकीकडे गाणे भक्तिगीत आहे, तर दुसरीकडे अट्टल गुन्हेगारांना विचार करायला भाग पाडणारी, त्यांचे प्रबोधन करणारी एक चिंतनशील कविता आहे!

शेवटी सदसद्विवेकबुद्धी जागी झालेले ते दरोडेखोर आपला प्रयत्न सोडून देतात आणि पूजा सुरू असलेल्या ठिकाणी येऊन बसतात. गाण्याची पुढची ओळ जेव्हा येते, तेव्हा आपण जे करत होतो ते पाप होते, याची त्यांना पुरेपूर जाणीव होते –

उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे, कर्तव्याचे माप…

मग आपल्याही मनात विचार येतो, खरेच भरतो का आपण आपले कर्तव्याचे माप, नीट शिगोशिग? की, इतरांना अनेक बाबतीत दोष देताना आपणही कर्तव्यात दीडदांडीच मारत असतो – ती धंद्यात असेल, ऑफिसातले काम करताना असेल किंवा कुटुंबातील ज्येष्ठांची जबाबदारी उचलताना असेल. आपण माप नीट भरतो का? असा विचार ही ओळ ऐकताना आल्याशिवाय राहात नाही.

दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा…

आज समाजात या गोष्टींचा उलटा प्रत्यय येत असतो. दुष्ट आणि दुर्जनच सेवाकार्यात, छुप्या स्वार्थासाठी पुढे येत असतात. प्रत्येक गोष्टींमागे त्यांचा काहीतरी मिळवण्याचा उद्देश असतो. पूरग्रस्तांना मदत करतानाही राजकारणी आपली लेबले लावून, निवडणुकीच्या प्रचारासारखी मदतफेरी काढतात. ज्यांची दु:खे, वेदना डोळ्यांतले अश्रू थांबू नयेत इतकी तीव्र आहेत, त्यांच्याबरोबर लोक मदत देतानांचे फोटो काढून घेतात. अलीकडे लोकसेवा तर दुर्जनाची बटिकच झालेली दिसते. जेव्हा माणूस प्रामाणिकपणे आपल्या वर्तनाचा अभ्यास करतो आणि त्याला आपल्या चांगल्या कृतीत लपलेला आपलाही स्वार्थ लक्षात येतो, तेव्हा स्वत:च्याच मनातली त्याची प्रतिमा वैरी होऊन त्याला छळू लागते. माणसाच्या मनाचे हे सूक्ष्म, अगदी आतले निरीक्षण, जगदीशजी सहज जाता जाता नोंदवून जातात –

स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा…

देवाला केलेली शेवटची विनंतीही खेबुडकरांची चतुराई दाखवते. ‘उघड’ दार देवा म्हणणारे श्रीधरपंत शेवटी चक्क तिजोरी ‘फुटावी’ म्हणतात –

तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा…

अलीकडे ज्ञानदेवांसारखी पांडुरंगानेही ‘ताटी’ जणू बंदच करून घेतली आहे! तो बाहेर यायला तयार नाही, दार कुठून उघडणार! भाबड्या भक्तांच्या मनाची तिजोरी उघडून त्यातील भक्तीचा ठेवा लुटायची खेबुडकरांची विनंती देवापर्यंत पोहोचेल की नाही देवच जाणे! पण अशी जुनी, भावुक करणारी, विचार करायला नकळत भाग पाडणारी गाणी ऐकली की, निदान आपल्या मनातील संस्कारांची तिजोरी उघडते हे नक्की! म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -