
शारजा (वृत्तसंस्था) : श्रीलंकेवर ४ विकेट्सनी मात करताना दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर - १२ फेरीत (ग्रुप १) दुसरा विजय नोंदवताना उपांत्य फेरीतील आव्हान कायम ठेवले. आफ्रिकेच्या विजयामुळे लेगस्पिनर वहिंदू हसरंगाच्या (२०-३) हॅटट्रिकवर पाणी फेरले गेले.
शारजामध्ये शनिवारच्या पहिल्या लढतीत प्रतिस्पर्ध्यांचे १४३ धावांचे आव्हान १९.५ षटकांत ४ विकेटच्या बदल्यात पार केले. हसरंगाच्या लागोपाठच्या दोन विकेटनंतर शेवटच्या १२ चेंडूंत द. आफ्रिकेला विजयासाठी आणखी २५ धावांची गरज होती. कगिसो रबाडाच्या षटकारामुळे दुशमंत चमीराने टाकलेल्या १९व्या षटकांत १० धावा निघाल्या. ६ चेंडूंत जिंकण्यासाठी १५ धावा असताना लहिरू कुमाराला दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूंवर षटकार ठोकताना डेव्हिड मिलरने सामना फिरवला. दोन चेंडूंत २ धावा असताना रबाडाने चौकार मारताना द. आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मिलरने १३ चेंडूंत नाबाद २३ धावा केल्या. त्याच्यापूर्वी कर्णधार टेंबा बवुमाने (४६ धावा) सर्वाधिक योगदान दिले.
त्यापूर्वी, श्रीलंकेला २० षटकांत १४२ धावांमध्ये रोखण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आले. त्यात सलामीवीर प्रथुम निसंकाच्या ७२ धावा सर्वाधिक आहेत. त्याने ५८ चेंडू खेळताना ६ चौकार आणि ३ षटकार लगावले. आफ्रिकेकडून ड्वायेन प्रीटोरियस आणि तबरेझ शम्सीने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे ग्रुप १ मधून सेमीफायनल गाठण्यासाठी तीन संघांत चुरस निर्माण झाली आहे.
हसरंगाची हॅटट्रिक
वहिंदु हसरंगाने वैयक्तिक चौथ्या षटकातील सुरुवातीच्या दोन चेंडूंवर कर्णधार बवुमा (४६ धावा) आणि प्रीटोरियसला (०) बाद केले. आधीच्या (तिसऱ्या) ओव्हर्समध्ये शेवटच्या चेंडूवर मर्करमला आउट करताना हॅटट्रिकची नोंद केली.