मुंबई (प्रतिनिधी) : तब्बल २७ दिवसानंतर आर्यन खान शनिवारी आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला. बाहेर येताच कुणाशीही न बोलला तो थेट पांढऱ्या रेंज रोव्हर कारच्या पाठच्या सीटवर बसला. नाही. त्याने चेहराही दाखवला नाही. त्यानंतर त्याचा ताफा थेट मन्नतच्या दिशेने गेला. मन्नतभोवती चाहत्यांची गर्दी होती.
आर्यनला पाहण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. आर्यन खान तुरुंगाच्या बाहेर येताच शाहरुखच्या अंगरक्षकांनी गाडीचा दरवाजा तात्काळ उघडला. काही सेकंदात आर्यन खान कारमध्ये बसला आणि त्यानंतर लगेचच कार मन्नतच्या दिशेने रवाना झाली. आर्यन पटकन कारमध्ये बसल्याने चाहत्यांना तो दिसला नाही. शाहरुख खानचा खासगी सुरक्षारक्षक रवी सिंह आणि एक बाऊन्सर आर्यनला घेण्यासाठी तुरुंगात गेले होते. आर्यनला मीडियापासून लांब ठेवण्याची पुरेपूर काळजी घेण्यात आली.
मन्नतवरही शाहरुखच्या फॅन्सने प्रचंड गर्दी केली होती. आर्यनच्या स्वागतासाठी ढोलताशे वाजवण्यात येत होते. काहींनी तर फटाके फोडून आर्यनचे स्वागत केले. मन्नतवर मोठी गर्दी उसळल्याने आर्यनची गाडी काही काळ बाहेर थांबली होती. गर्दी पांगवल्यानंतर गाडी मन्नतमध्ये गेली.
मुनमुनसमोर कायदेशी अडसर
आर्यनबरोबर अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांना देखील जामीन मंजूर झाला आहे. तथापि, आर्यन खानची सुटका होत असताना दुसरीकडे जामीन मंजूर होऊन देखील मुनमुन धामेचाची सुटका नियमांच्या कचाट्यात अडकली आहे.
आर्यनच्या जामिनासाठी शाहरुख खानची मैत्रीण जुही चावला ही जामीनदार म्हणून राहिली आहे. १ लाखांच्या जातमुचलक्यावर आर्यन खानची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र, असा जामीन शोधण्यात मुनमुन धामेचाला अडचण येत असल्याचे सांगितले जात आहे.
मुनमुन धामेचाला तात्पुरत्या रोख रकमेवर जामिनावर सोडावे, अशी विनंती तिच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. मुनमुन ही मध्य प्रदेशची रहिवासी असल्यामुळे तिला जामीन राहणारी व्यक्ती शोधण्यात अडचणी येत असल्याचे बार अँड बेंचकडून सांगण्यात आले.