भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणे यांचे आवाहन
संतोष वायंगणकर
कुडाळ : ‘मी दिल्लीत केंद्रीय मंत्री असलो तरीही माझे सारे लक्ष माझ्या कोकणाकडे आहे. मी जोडलेली कोकणातील माणसं ही पदाने नव्हे, तर प्रेमाने जोडली आहेत. पदं मिळतील आणि जातीलही; परंतु माझं माझ्या कोकणच्या जनतेशी असलेले नाते हे अतुट आहे. कोकणात माझ्या उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योजक निर्माण होऊन त्यातून कोकणात प्रत्येकजण उद्योगी बनला पाहिजे. एकहीजण बेकार राहता कामा नये, हा माझा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना आपण फक्त साथ द्या’, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.
कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि.प.अध्यक्षा सौ. संजना सावंत, सौ. संध्या तेर्से, अॅड. अजित गोगटे, अतुल काळसेकर, अॅड. संग्राम देसाई, भाजप रत्नागिरी-सिंधुदुर्ग संघटनमंत्री शैलेश दळवी, रणजित देसाई, राजू राऊळ, अशोक सावंत आदी उपस्थित होते.
‘तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्री झालो. देशातील ८० टक्के उद्योग माझ्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागात येतात. गेल्या तीन महिन्यांत अनेक गोष्टी मी समजून घेतल्या आहेत’, असे ना. राणे म्हणाले. ‘दिवाळी संपताच केंद्रातील उद्योग विभागातील अधिकाऱ्यांचे एक पथक जिल्ह्यात येईल. किनारपट्टीची पाहणी करतील. समुद्र भागात कोणते व्यवसाय होऊ शकतात, अन्य कोण-कोणत्या व्यवसायांची कोकणात उभारणी करता येईल, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देऊन कोकणातील बेकारी नष्ट करता येईल हे पाहिले जाईल. २०० कोटींच्या प्रशिक्षण केंद्राची उभारणीही कुडाळ तालुक्यात केली जाणार आहे. या प्रशिक्षण केंद्रात सर्व उद्योगांसाठी प्रशिक्षण दिले जाईल’, अशी माहिती राणे यांनी दिली. तसेच, आंबा आता जपाननेही तयार केला आहे. ८०० ग्रॅम वजनाचा आंबा जगभरात जपानने आणला आहे. अमेरिकेतही संशोधन करून सिडलेस फळं उत्पादित केली जातात तसे आपणही करण्याची आवश्यकता आहे. फळांवर प्रक्रिया उद्योगाची निर्मिती झाली पाहिजे. विविध राज्यांमध्ये याच विभागांतर्गत जे उद्योग उभे राहिले त्यात अगरबत्ती, गवती चहा, लाकडाच्या भुशापासून तयार होणारे फर्निचर अशा उद्योगांच्या माहितीचा खजिनाच राणे यांनी आपल्या भाषणातून मांडला. ‘यापुढच्या काळात कोकणातील तरुणांनी वेळ वाया घालवू नये. जो वेळ, हसून, बसून आणि टिंगलटवाळीत वाया घालविला जातो, त्यापेक्षा तेवढा वेळ अधिकचे काम करून वैयक्तिकरीत्या आर्थिक सुबत्ता कशी येईल हे पाहावे. कोकण निश्चितपणे यातून आर्थिक समृद्ध होईल’, असे ते म्हणाले.
सर्व निवडणुकीत भाजपची सत्ता आली पाहिजे…
कोकणात होणाऱ्या यापुढच्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आली पाहिजे. त्यापुढे कोणात्याही पक्षाशी गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. एकाचवेळी अनेकांना संधी मिळत नाही, तर एखाद्याला एखादी उमेदवारी मिळाली नाही, तर नाराज न होता काम करत राहिले पाहिजे. यापुढच्या काळात वर्षभर निवडणुकाच आहेत. या निवडणुकांमध्ये यश भाजपला मिळाले पाहिजे. त्यात कोणाचीही गय करणार नाही. सर्व निवडणुकांमध्ये भाजपचीच सत्ता यायला हवी, असे राणे यांनी स्पष्ट केले.