Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीजामीन मिळूनही आर्यन खान तुरूंगातच

जामीन मिळूनही आर्यन खान तुरूंगातच

आज सुटकेची शक्यता, जुही चावला बनली जामिनदार

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुटका केली आहे. आर्यनसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्या जामीन अर्जावरील निकालाची प्रत हायकोर्टाकडून जारी करण्यात आली.. मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येकी १ लाखांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश देत कठोर अटीशर्तीही लागू केल्या आहेत. निकालाची प्रत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात सादर होताच कोर्टाने सुटकेचे आदेश दिले. त्यामुळे या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सत्र न्यायालयात पोहोचली आणि तिने सही केली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे हे ५ वाजून १० मिनिटांनी सत्र न्यायालयातून आर्थर रोड तुरुंगाच्या दिशेने जामिनाची प्रत घेऊन निघाले. मात्र, आर्थर रोड जेलची जामीन प्रत स्वीकारण्याची वेळ उलटून गेल्याने शुक्रवारची रात्र देखील आर्यनला आर्थर तुरुंगात घालवावी लागली आहे.

त्यामुळे आर्यन खानची जेलमधून सुटका २७ दिवसांनी म्हणजे शनिवारी होणार आहे. आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने सर्वांना नियम सामान असून कुणासाठीही वेळेत बदल होणार नाही असे म्हटले आहे. सुटकेसाठी आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत रिलीझ ऑर्डरची प्रत प्रत्यक्ष टाकावी लागते. यासाठी तुरुंग अधिकारी ५.३५ वाजेपर्यंत थांबतात अशी माहिती आर्थर रोड जेल अधीक्षक नितीन वायचल यांनी दिली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की, जुही चावला ह्या आर्यनला लहानपणापासून ओळखतात. त्यामुळे जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला पुढे आल्या. १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत सविस्तर निकालपत्र दिले. न्यायालयाने गुरुवारी जामीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे आर्यन तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्यता होती. दरम्यान, आरोपींनी त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार जे गुन्हे दाखल आहेत त्या किंवा तशा इतर कोणत्याही कृतीमध्ये सहभागी होऊ नये. तसेच आरोपींनी या गुन्ह्यातील सहआरोपी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, त्याचप्रमाणे दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजेरी लावणे, एनडीपीएस कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, आरोपींनी तत्काळ आपले पासपोर्ट विशेष न्यायालयाकडे जमा करावेत,आरोपींनी विशेष न्यायालयासमोर सुरू असलेल्या प्रकरणावर कोणत्याही प्रकारच्या माध्यमांसमोर वक्तव्य करू नयेत, विशेष न्यायालयाकडून परवानगी घेतल्याशिवाय आरोपींनी देश सोडून कुठेही जाऊ नये,आरोपींना मुंबई बाहेर कुठेही जायचे असेल तर त्यांना तपास अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी लागेल, तसेच तपास अधिकाऱ्यांना आपल्या प्रवासाचे सर्व तपशील द्यावे लागतील,आरोपींना न्यायालयातील प्रत्येक तारखेला हजर रहावे लागेल, याला केवळ विशेष परिस्थितीत अपवाद असेल, आरोपींना एनसीबी तपासासाठी जेव्हा जेव्हा बोलावेल तेव्हा चौकशीसाठी हजर रहावे लागेल. खटला सुरू झाल्यानंतर आरोपीने ही सुनावणी प्रलंबित होईल किंवा उशीर लागेल असे काहीही करू नये, आरोपीने यापैकी कोणत्याही अटीचा भंग केल्यास एनसीबीला विशेष न्यायालयात जामीन रद्द करण्याचा अधिकार असेल अशा अनेक अटीशर्ती हायकोर्टाने लागू केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -