केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा इशारा
सावंतवाडी (प्रतिनिधी) : ‘राज्यातील आघाडी सरकार कधी पडणार हे सांगणार नाही. अशा गोष्टी सांगून करायच्या नसतात. त्यामुळे न सांगता राज्य सरकारचा ‘कार्यक्रम’ करणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री यांनी नारायण राणे यांनी केला. या आधीही मी कॉंग्रेसचे सरकार पाडायचा प्रयत्न केला होता. त्यांचे २२ आमदार मी अज्ञातस्थळी नेऊन ठेवले होते. मात्र एवढ्या एजन्सी असून त्यांना देखील मागमूस लागला नव्हता. तसाच आताही न सांगता कार्यक्रम करणार, असा गौप्यस्फोट केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला.
सावंतवाडी नगरपालिका दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब व पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार दिवाळीनंतर पाडणार असल्याची चर्चा आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीने ‘मिशन लोटस’ प्लान आखला असून याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. नारायण राणे यांनी केंद्रीय उद्योग मंत्री झाल्यानंतर तसेच नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर पहिल्यांदाच सावंतवाडी नगर परिषदेस भेट दिली. यावेळी राणेंनी जोरदार फटकेबाजी केली.
‘मोपा विमानतळ होत असले तरी चिपी विमानतळावर त्याचा परिणाम होऊ देणार नाही. मी नेहमी चांगला विचार करतो. शिवसेनेने राजकारण करून कमी केलेली धावपट्टी पुन्हा वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. धमक असेल तर ती शिवसेनेने वाढवून दाखवावी. भविष्यात जास्तीत जास्त विमाने या ठिकाणी उतरावीत आणि जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत’, अस मत राणे यांनी व्यक्त केले. मंत्री असताना, २२ वर्षे नगरपालिका ताब्यात असताना शहराला काय दिले्? असा सवाल नारायण राणे यांनी केला. अशा बिनडोक माणसाबाबत प्रश्न करू नका, असा जोरदार टोला आमदार केसरकर यांना नारायण राणेंनी हाणला.
दरम्यान, रोजगार निर्माण करण्याचे काम आम्ही करणार असून शहरातील स्टॉल काढायला केसरकरांना ठेवलंय असा खोचक टोला त्यांनी लगावला. शहरासह, जिल्ह्यातील तरुणांना रोजगार, उद्योग देणे, यातून देशाचा विकासदर वाढवणे यासाठी केंद्रीय मंत्री म्हणून माझा प्रयत्न आहे. चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर, मशीन पुरवठा करून चांगले उत्पादन करण्यावर भर असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर वेगळे व्यवसाय, फॉरेस्टमध्ये मधासारखे प्रकल्प, महिलांसाठी अगरबत्ती, काथ्या उद्योग, वेगवेगळे कारखाने आणणार यासाठी आपले अधिक प्रयत्न असणार, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, आपण स्टॉल नाही आणणार, जनतेच आर्थिक परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नारायण राणेंनी व्यक्त केले.
‘जनतेचे दिवाळे निघावे, असा कोणत्याच सरकारचा प्रयत्न नसतो. त्यासाठी कोणतेही सरकार प्रयत्न करत नाही. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढायला कारणे आहेत. पेट्रोल, डिझेल परदेशातून आयात होत असल्याने त्याचे भाव वाढले आहेत. मात्र, वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे जनतेची ही चिंता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवत त्यांचे लक्ष वेधणार असल्याची प्रतिक्रिया ना. राणे यांनी एका प्रश्नाला दिली.