Saturday, June 29, 2024
Homeताज्या घडामोडीपाली येथे कचरा समस्या बिकट

पाली येथे कचरा समस्या बिकट

घंटागाड्या असूनही कचरा रस्त्यावर

दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात; नागरिकांनी शिस्त पाळण्याची गरज

गौसखान पठाण

सुधागड-पाली : अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली येथे कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे. शहरात नगरपंचायतीच्या घंटागाड्या फिरून देखील काही नागरिक फुटक्या कचरा कुंड्यांमध्ये आणि रस्त्यावर कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालीतील कचरा समस्येवर मात करण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीतर्फे ४ वर्षांपूर्वी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या नगरपंचायतीकडे ४ घंटागाड्या कार्यरत आहेत.

या घंटागाड्या येथील विविध भागात फिरून कचरा गोळा करतात. आठवड्यातून रविवारीच फक्त घंटागाड्या येत नाहीत. त्यानंतर सोमवारी अनेक ठिकाणच्या कचरा कुंड्या व रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग पडलेला असतो, तर इतर दिवशी देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार तसेच अनेक जण घरात किंवा सोयटीमध्ये साठवून न ठेवता लागलीच कचरा कुंड्यांमध्ये व रस्त्यांवर टाकतात, तर काहीजण दिवसभर घरी नसल्यास जमा झालेला कचरा आजूबाजूच्या कचरा कुंड्यांमध्ये किंवा रस्त्यावर टाकून देतात. परिणामी कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’च राहते. त्यामुळे नागरिकांसह भाविकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. भटके कुत्रे व जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त करतात. तसेच गुरे-ढोरे व भटके कुत्रे यातून अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा सर्व कचरा व घाण रस्त्यावर व बाजूच्या गटारात पडते आणि गटारे तुंबून आणखी समस्या उद्भवते.

अपुरे सफाई कर्मचारी

पाली नगरपंचायतीकडे अधिकृत १५ ते १८ सफाई कर्मचारी आहेत. मात्र, पगार कमी व सेवासुविधांचा अभाव यामुळे प्रत्यक्षात जेमतेम ९ ते १० कर्मचारी रोज कामावर येतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येतो. परिणामी सर्वच ठिकाणची साफसफाई करणे त्यांना शक्य होत नाही.


नजीकच्या काळात पालीतील सर्व कचराकुंड्या बंद करणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी घंटागाडीमध्येच कचरा टाकावा. कचराकुंडीत कचरा टाकला तरी तो बाहेर पडू देऊ नये. नागरिकांनी शिस्त पाळण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून गाव स्वच्छ व सुंदर राहील. नागरिकांनी देखील योग्य कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे. – दिलीप रायण्णावार, प्रशासक, पाली नगरपंचायत


पालीत घंटागाडी नियमित फिरत असूनही काही नागरिक नादुरुस्त कचरा कुंड्यामध्ये व रस्त्यावर आपला कचरा टाकतात. परिणामी कोरोना काळात आजारांना निमंत्रण देतात. घंटागाडी असताना कचराकुंडीची गरजच नाही. नगरपंचायतीने नागरिकांना घंटागाडीचा वापर करण्यासाठी जनजागृती व नियोजन करावे. तसेच डम्पिंग ग्राऊंड सुद्धा बंदिस्त असावे. – कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -