Monday, June 30, 2025

मीरा रोडमध्ये भराव टाकून तलाव बुजवण्याचा प्रयत्न!

मीरा रोडमध्ये भराव टाकून तलाव बुजवण्याचा प्रयत्न!

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील मीरा गावठाण येथील नैसर्गिक तलावात मातीचा भराव टाकून तो बुजविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती बातमीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून दिल्यावर सुद्धा कोणतीही कारवाई न केल्यामुळे तहसीलदार कार्यालय तो तलाव चोरी होण्याची वाट पाहत आहे का? अशी चर्चा आहे.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मागील बाजूस निसर्गरम्य परिसरात वसलेल्या मीरा गावठाणमध्ये नैसर्गिक तलाव असून गेल्या काही दिवसांपासून या तलावाच्या एका बाजूला श्री हरिकृपा हॉस्पिटल असा फलक लावण्यात आला आणि त्याच बाजूने रोज रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत माती भराव केला जात होता. त्यामुळे तलावाची रुंदी कमी कमी होत गेली आहे. तलावाच्या अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तलाठी कार्यालयाकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.


या संदर्भात प्रसिद्ध झालेली बातमी तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली गेली. तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला गेला. याला एक महिना होऊन गेला तरीसुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने तहसीलदार कार्यालय तो तलाव चोरी होण्याची वाट पाहत आहे का? अशी चर्चा आहे.


‘...माहिती घेतो’


या प्रकरणी अपर तहसीलदार डॉ. नंदकिशोर देशमुख यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी संबंधित तलाठी यांच्याकडून माहिती घेऊन नंतर प्रतिक्रिया देतो, असे सांगितले. त्यानंतर सुद्धा सातत्याने फोन करूनही तहसीलदार डॉ. नंदकिशोर देशमुख यांनी फोन उचलला नाही.

Comments
Add Comment