
पणजी (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेसने राजकारणात पदार्पण केले आहे. क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो राजकीय क्षेत्रात दाखल झाला आहे. आपल्या या नव्या इनिंगसाठी त्याने तृणमूल काँग्रेसची (टीएमसी) निवड केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पेसने गोव्यामध्ये टीएमसीमध्ये शुक्रवारी प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी त्याचे पक्षात स्वागत केले.
आपणास सांगण्यास आनंद होत आहे की, पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. मी अतिशय आनंद आहे. तो माझा लहान भाऊ आहे. मी जेव्हा युवा मंत्री होते, तेव्हा तो अतिशय तरूण होता. तेव्हापासून मी त्याला ओळखते, असे ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. येत्या काळात गोव्यात विधानसभा निवडणुका होणार असून ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे.