अहमदनगर (वृत्तसंस्था) : दिवाळी अवघी काही दिवसांवर आलेली असताना एका एसटी कर्मचाऱ्याने चक्क एसटी बसच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी शिडीला गळफास लावून आत्महत्या केली. विविध प्रलंबित मागण्यांच्या पुष्ठ्यर्थ एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले होते. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे मान्य केल्याने संप मागे घेण्यात आला असला तरी शुक्रवारी सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारमध्ये एका एसटीचालकाने बसच्या शिडीला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेमुळे शेवगाव आगारात आणि कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. दिलीप काकडे यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. विशेष म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात ते सहभागी झाले होते. दिलीप हरिभाऊ काकडे (५६) असे या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. संपामुळे सर्व बस शेवगाव आगार डेपोत लावण्यात आल्या होत्या. काकडे हे मुक्कामी बस घेऊन आले होते. त्यांनीही संपात सहभाग घेतला होता. मात्र, शुक्रवारी सकाळी बस (एमएच ४० एन ८८४९)च्या शिडीला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब डेपोतील कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. काकडे हे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सदस्य आहेत. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट आढळून आलेली नाही.
कर्मचाऱ्यांचे आंदोलन अनेक ठिकाणी सुरूच, प्रवाशांचे हाल कायम
महामंडळाने आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर एसटी कर्मचारी कृती समितीनेही गुरुवारी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शुक्रवारपासून राज्यातील एसटी वाहतूक सेवा सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आजही राज्यात अनेक एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे. एसटी कर्मचारी कृती समितीबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलन मागे घेण्यास एसटी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. विशेषतः महाड, दापोली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळे या जिल्ह्यांतील विविध एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा जोर तीव्र आहे. राज्यात इतरही ठिकाणी तुरळक का होईना एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील शेगाव डेपो मध्ये एसटी कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संतापात भर पडली आहे. या आंदोलनाचा फटका संबंधीत जिल्ह्यात सर्वसामान्यांना बसला असून म्हणावी तेवढी एसटी सेवा राज्यात सुरळित सुरु झालेली नाही. तेव्हा यावर आता कसा तोडगा निघणार, आंदोलन किती दिवस चालणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहीलेलं आहे.
सरकारने समस्यांचे निराकरण करावे : फडणवीस
‘नगरमधील एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, यापूर्वी २८ एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, अनियमित वेतनाच्या समस्या, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल,’ अशा साऱ्याच बातम्या अत्यंत वेदनादायी आहेत. राज्य सरकारने या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्वरित त्याचे निराकरण करावे’, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे.
तर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील या घटनेवरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘एका बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू सांगायचे, तर दुसऱ्या बाजूला कर्मचारी वैफल्याने आत्महत्या करत आहेत. आता तरी सरकार जागे होणार आहे की नाही? जर एसटी कर्मचाऱ्यांच्या अशाच आत्महत्या होत राहिल्या, तर महाराष्ट्रात आगडोंब उसळेल आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार राज्य सरकारच असेल’, असे दरेकर म्हणाले.