राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात राज्यपालांकडून स्तुतिसुमने
अहमदनगर (वार्ताहर) : ‘ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या देशाचे चमकते तारे आहेत. कोणतीही पदवी आणि पुरस्कारांच्या पलीकडचे त्यांचे काम आहे. विद्यापीठांनी धोरणे आखताना त्यांचा सल्ला घ्यावा’, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या दोन्ही नेत्यांचे कौतुक केले. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ गुरुवारी झाला. त्यामध्ये पवार व गडकरी यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
राहुरी कृषी विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री दादाजी भुसे, जयपूरच्या महाराणा प्रताप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठोड हे उपस्थित होते. राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर गडकरी, पवार यांच्यासह विद्यापीठाच्या स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
यावेळी राज्यपाल म्हणाले की, ‘पवार आणि गडकरी हे देशाचे चमकते तारे आहेत. हे दोघेही केवळ कृषी नव्हे, तर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. पवार यांचे कृषी आणि सहकार क्षेत्रातील मोठे योगदान सर्वांनाच ठाऊक आहे. त्यासोबतच गडकरी अनेक क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे काम प्रेरणादायी आहे. दररोज जसा नवा सूर्य उगवतो, तसे गडकरी नवा विचार घेऊन येतात, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करतात. माझी अशी धारणा आहे की, आपण जे चांगले आहे, ते कोठूनही स्वीकारले पाहिजे. त्यामुळे विद्यापीठांनी या दोघांच्या ज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे’, असेही राज्यपाल म्हणाले.