Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

बांगलादेशचे पॅकअप

बांगलादेशचे पॅकअप

वेस्ट इंडिजकडून ३ विकेटनी पराभव




शारजा (वृत्तसंस्था) : गतविजेता वेस्ट इंडिजकडून चुरशीच्या लढतीत शुक्रवारी ३ धावांनी पराभूत व्हावे लागल्याने बांगलादेशचे आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील आव्हान सुपर-१२ फेरीतच संपुष्टात आले. ग्रुप १ गटात असलेल्या बांगलादेशचा हा सलग तिसरा पराभव आहे.


वेस्ट इंडिजचे १४३ धावांचे लक्ष्य गाठताना बांगलादेशने २० षटकांत ५ बाद १३९ धावांची मजल मारली. तिसऱ्या क्रमांकावरील लिटन दास (४३ चेंडूंत ४४ धावा) तसेच मधल्या फळीतील कर्णधार महमुदुल्लाच्या (२४ चेंडूंत नाबाद ३१ धावा) फटकेबाजीमुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या षटकात १३ धावांची गरज असताना आंद्रे रसेलने नऊ धावा देत प्रतिस्पर्ध्यांना विजयापासून रोखले. तसेच गतविजेत्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. वेस्ट इंडिजच्या प्रत्येक गोलंदाजाने विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.


त्यापूर्वी, वनडाऊन रोस्टन चेस आणि निकोलस पूरनच्या आक्रमक खेळीमुळे विंडीजने २० षटकांत ७ बाद १४२ धावा केल्या. ख्रिस गेलसह (४) इविन लुइस (६), शिमरॉन हेटमायर (९) लवकर बाद झाल्याने संघाची अवस्था ३ बाद ३२ धावा अशी झाली. मात्र, चेसने पूरनसह वेस्ट इंडिजला दीडशेच्या घरात केले. चेसने ४६ चेंडूंत ३९ धावा केल्या. त्यात २ चौकारांचा समावेश आहे. पूरनने २२ चेंडूंत एक चौकार आणि ४ षटकारांसह सर्वाधिक ४० धावा केल्या.


पोलार्ड रिटायर्ड आऊट की रिटायर्ड हर्ट?


कर्णधार पोलार्ड अचानक मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला. पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी पोलार्डने १६ चेंडूत केवळ ८ धावा केल्या होत्या. पोलार्डला फटकेबाजी करता येत नसल्याने त्याने पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment