दुबई (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील (ग्रुप २) शुक्रवारच्या (२९ ऑक्टोबर) दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानची गाठ अफगाणिस्तानशी आहे. तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्धी पाहता फॉर्मात असलेल्या बाबर आझम आणि सहकाऱ्यांना सलग तिसरा विजय मिळवून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनल प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्याची संधी आहे.
उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की…
टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सुपर १२ फेरीत सलग दोन सामने जिंकण्याची करामत पाकिस्तानसह इंग्लंडला करता आली आहे. माजी विजेता भारतासह न्यूझीलंडला हरवणाऱ्या पाकिस्तानचे आणखी तीन सामने शिल्लक आहेत. यात एखादा विजय त्यांना आगेकूच करण्यासाठी पुरेसा आहे. पाकिस्तानचे उर्वरित तीन सामने अफगाणिस्तानसह स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. तिन्ही लढतीत बाबर आणि कंपनीचे पारडे जड आहे. त्यामुळे, पाकिस्तानला ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान मिळवत अंतिम चार संघांमध्ये प्रवेश करण्याची सर्वाधिक संधी आहे.
अन्य क्रिकेटपटूंना सूर गवसावा
पाकिस्तानने धडाकेबाज सुरुवात करताना प्रारंभीच्या दोन्ही लढती जिंकल्या. त्यात विजय मिळवताना फारसे सायास पडले नसले तरी काही आघाड्यांवर अद्याप सुधारणा आवश्यक आहे. आझम आणि रिझवानला सूर गवसला; तरी फखर झमन, इमाद वासिम आणि मोहम्मद हफीझला मागील दोन सामन्यांत प्रत्येकी ११ धावा करता आल्या आहेत. शोएब मलिकला भारताविरुद्ध फलंदाजी मिळाली नाही तरी न्यूझीलंडविरुद्ध त्याचा अनुभव आणि समज कामी आली. उर्वरित स्पर्धेत सातत्य राखण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रौफ या वेगवान दुकलीने गोलंदाजीची धुरा सांभाळली, तरी डावखुरा फिरकीपटू इमाद वासिम व लेगस्पिनर शादाब खानला प्रभाव पाडता आलेला नाही.
अफगाणची कसोटी
अननुभवी स्कॉटलंडला हरवून अफगाणिस्तानने सुपर-१२ फेरीची विजयी सुरुवात केली. सुरुवातीचा पेपर सोपा होता. मात्र, ग्रुप २ मधील तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध त्यांचा कस लागेल. त्याची सुरुवात पाकिस्तानपासून होईल. उभय संघांमध्ये यापूर्वी, एकमेव टी-ट्वेन्टी सामना २०१३मध्ये शारजामध्ये (यूएई) झाला होता. त्यात पाकिस्तानने बाजी मारली. सध्याचा पाकिस्तानचा फॉर्म पाहता बांगलादेशसमोर खेळ उंचावण्याचे मोठे आव्हान आहे.
सलामीलाच मिळालेल्या विजयामध्ये फलंदाजीत नजीबुल्ला झाड्रन, रहमतुल्ला गुरबझ, हझरतुल्ला झाझाइ तसेच गोलंदाजीत ऑफस्पिनर मुजीब-उर-रहमान तसेच लेगस्पिनर रशीद खानने छाप पाडली. पाकिस्तानला चुरस द्यायची असेल तर अफगाण संघाच्या अन्य प्रमुख क्रिकेटपटूंना खेळ उंचवावा लागेल.
खेळाचा आनंद लुटत आहेत
भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या विजयांचे वैशिष्ट्य म्हणजे पाकिस्तानचे सर्व क्रिकेटपटू खेळाचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दडपण येत आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध गोलंदाज मॅचविनर ठरले. किवींविरुद्ध गोलंदाजांसह फलंदाजांनीही थोडी मेहनत घेतली. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने भारताच्या गोलंदाजांना सहज खेळून काढले. अर्थात ते स्पेशालिस्ट बॅटर आहेत. न्यूझीलंडविरुद्ध रिझवानने सातत्य राखले, तरी कर्णधार आझमसह फखर झमन आणि मोहम्मद हफीझ, इमाद वासिम हे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. मात्र, अनुभवी शोएब मलिक आणि असिफ अलीने दाखवलेली जिगर उल्लेखनीय आहे. आम्ही अमुक एका क्रिकेटपटूंवर अवलंबून नाही. तसेच आमची दुसरी फळीही मजबूत आहे, हे हॅरिस रौफ तसेच मलिक, असिफच्या माध्यमातून पाकिस्तानने दाखवून दिले. एकाहून अनेक अष्टपैलू खेळाडू ही त्यांची जमेची बाजू आहे.
वेळ : रा. ७.३० वा.