Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीएनसीबी चौकशी पथकाकडून वानखेडेंसह सहा अधिकाऱ्यांची चौकशी

एनसीबी चौकशी पथकाकडून वानखेडेंसह सहा अधिकाऱ्यांची चौकशी

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील खंडणीच्या आरोपांची एनसीबीचे दिल्लीतील दक्षता पथक चौकशी करत असून या पथकाने आतापर्यंत एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे तसेच अन्य पाच अधिकारी आणि तीन स्वतंत्र पंच साक्षिदारांची चौकशी केली आहे. विविध पुरावे आणि दस्तावेजही ताब्यात घेण्यात आले असून खंडणीचा आरोप करणारा पंच साक्षीदार प्रभाकर साईल हा मात्र या चौकशी पथकासमोर अद्याप हजर झालेला नाही. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून मुंबई पोलिसांकडे सहाय्य मागण्यात आले आहे,
असे दक्षता पथकाचे प्रमुख आणि एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान याला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी करण्यात आली होती. याबाबत किरण गोसावी याचे सॅम डिसुझा या व्यक्तीशी बोलणे झाले होते. यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना दिले जाणार होते, असा धक्कादायक दावा प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्रावर केला आहे. त्याच प्रतिज्ञापत्राच्या आधारे एनसीबी महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले असताना साईल मात्र चौकशीपासून दूर राहिला आहे. साईल याच्याशी संपर्क साधण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही केले. त्यात तो मुंबई पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मीडियातून मिळाली. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना आजच पत्र लिहिले आहे व साईल याला एनसीबीसमोर हजर करण्यास साह्य करावे, अशी विनंती केली आहे, असे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

प्रभाकर साईल याच्या आरोपांचा आम्ही स्वतंत्र ठिकाणी तपास केला. गेले तीन दिवस आम्ही प्रथम समीर वानखेडे आणि नंतर पाच इतर अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यासोबतच या प्रकरणातील तीन पंच साक्षीदारांची चौकशीही करण्यात आली आहे. अनेक पुरावे आणि दस्तावेज आम्ही गोळा केले असून ते आम्ही पडताळत आहोत.

वानखेडे यांच्याकडून आम्ही काही आणखी कागदपत्रे मागितली असून गरज भासल्यास त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले. यात आर्यन खानची चौकशी केली जाणार का, असे विचारले असता या प्रकरणात ज्यांची चौकशी आवश्यक असेल त्या सर्वांची चौकशी केली जाईल, असे सिंह म्हणाले. किरण गोसावी याला सध्या अटक झाली आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीसाठी आम्हाला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असेही सिंह यांनी सांगितले.

प्रभाकर साईल मात्र अद्याप गैरहजर

मलिक यांनी केलेले आरोप निराधार : काशिफ खान

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी, समीर वानखेडे हे क्रुझ पार्टीचे आयोजक काशिफ खान यांचे मित्र असल्यामुळेच त्यांना अटक केली नसल्याचा दावा केला आहे. तर समीर वानखेडे यांनी हे नवे आरोप फेटाळले असले, तरी यासंदर्भात काशिफ खान यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. अखेर यासंदर्भात बोलताना काशिफ खान यांनी सांगितले की, नवाब मलिक यांच्याकडे अपुरी माहिती आहे. सर्व चुकीची माहिती त्यांच्याकडे आहे. माझा कोणत्याही ड्रग्जच्या व्यवहाराशी संबंध नाही. साधी सिगारेटही मी ओढत नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहेत. त्यांना मी ओळखत नाही, मी त्यांना कधीही भेटलेलो नाही.त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -