Friday, May 9, 2025

क्रीडा

भारताची सलामी इराणशी

भारताची सलामी इराणशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एएफसी महिला एशियन फुटबॉल कप २०२२ स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) सज्ज आहे. या स्पर्धेचा ड्रॉ गुरुवारी काढण्यात आला. सलामीला (२० जानेवारी) यजमान भारताची गाठ स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या इराणशी आहे. त्याच दिवशी दुसऱ्या सामन्यात आठ वेळेचे विजेते चीन आणि चायनीज तैपेई यांच्या सामना होईल.


क्वालालंपूरमध्ये (मलेशियात ) स्पर्धेचा ड्रॉ झाला. यजमान भारत आणि स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या इराण यांच्या दरम्यान उदघाटनाचा सामना सायंकाळी ७.३० वाजता नवी मुंबईतील डी. वाय पाटील मैदानावर होईल. त्यापूर्वी, स्टील रोझेस म्हणून परिचित असणाऱ्या चीन आणि चायनीज तैपेई हा अ गटातील सामना दुपारी ३.३० वाजता मुंबई फुटबॉल एरिना, अंधेरी येथे खेळविण्यात येईल. एएफसी वुमन्स एशियन कप' ही आशिया खंडातील महिलांची प्रमुख स्पर्धा आहे. या स्पर्धेचे २०२२ मध्ये आयोजन करण्याची संधी भारताला मिळाली याचा आम्हाला अभिमान आहे, असे भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पर्धेच्या 'ड्रॉ 'नंतर सांगितले.


स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी (२१ जानेवारी) २०१० मधील विजेते ऑस्ट्रेलिया आणि गेल्या दोन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या इंडोनेशिया यांच्यात सामना होईल. हा सामना दु. ३.३० वा. मुंबई फुटबॉल एरिना येथे होईल. त्याच दिवशी संध्याकाळी ५.३० वा. ब गटातील थायलंड वि. फिलिपाईन्स हा सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर होईल. याच दिवशी क गटात गतविजेते जपान म्यानमार विरुद्ध आपल्या मोहिमेस सुरुवात करतील. हा सामना दु.१.३० वा. होईल. त्यानंतर कोरिया प्रजासत्ताक आणि व्हिएतनाम यांच्या दरम्यान सायंकाळी ७.३० वा. सामना होईल. हे दोन्ही सामने पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होतील.


या एएफसी कप स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेतील पहिले पाच संघ २०२३ मध्ये होणाऱ्या फिफा महिला विश्वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. ही विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संयुक्तपणे आयोजित करणार आहेत.

Comments
Add Comment