मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू केला असला तरी तिकीट मिळत नसल्याने अडचणी कायम आहेत. यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेल्यांना अद्यापही सरकारने तिकीट देणे सुरू केले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे, तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता केवळ लोकल पास देणेच सुरू केले आहे.
राज्य सरकारने २६ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढले होते, त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे नियम लागू केले होते. या नियमांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलचे पास दिले जात होते. हाच नियम आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांची प्रवासाची अडचण निर्माण झाली आहे. २८ ऑक्टोबर पासून हा निर्णय लागू केल्यानंतर गुरुवारच्या दुपारनंतर लोकलच्या मुंबई तसेच उपनगरातील काही तिकीट खिडक्यांवर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना तिकीट देणे बंद केले. यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारीही मोठ्या प्रमाणात तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाले. अनेक रेल्वे स्थानकांवर हीच परिस्थिती होती, तर गर्दीदेखील झाली होती.
राज्य सरकारच्या या उलटसुलट निर्णयामुळे नागरीकांना मोठा त्रास होत आहे. जर दोन लसी घेतलेल्यांना विमान प्रवास, मंदिर प्रवेश खुला केला आहे, तर लोकल प्रवासाची सरकार अडचण का करत आहे? असा सवाल मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांनी केला आहे. दरम्यान दोन लसी घेतलेल्यांना तिकीट उपलब्ध करून द्यावी, अन्यथा याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.