कोरोना जातोय, तक्रारी उरताहेत…

Share

डॉ. पंकज जैन

साऱ्या जगाला कवेत घेणाऱ्या कोरोनाची धास्ती प्रत्येकाने घेतली. कोरोनावरील उपचारानंतर आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली की, प्रत्येकाचा जीव भांड्यात पडतो. आता आपण कोरोनातून बाहेर पडलो असून यापुढे कसलाही त्रास होणार नाही, असं कोरोनाग्रस्त राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. त्यामुळे रुग्ण कोरोनोत्तर काळात नेहमीप्रमाणे निर्धास्त राहून नियमित जीवन जगू लागतो. मात्र, काही काळानंतर अनेकांना आरोग्याच्या काही तक्रारी, समस्या जाणवू लागतात. त्यावेळी आपल्याला कळून चुकतं की, कोरोनातून आपण बाहेर पडलो असलो तरी या व्याधीने आपल्या काही पाऊलखुणा आपल्या शरीरात सोडल्या आहेत. वैद्यकीय भाषेत या पाऊलखुणांचं वर्णन ‘लाँग कोव्हिड’ असं केलं जातं. लाँग कोव्हिडची लक्षणं सरसकट प्रत्येकात जाणवतात, असं म्हणता येत नाही. वाढत्या वयाच्या रुग्णांमध्ये आणि प्रामुख्याने महिलांमध्ये याची लक्षणं आढळतात. कोरोना होऊन गेलेल्या सुमारे २० ते २५ टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळतात. युरोपमध्ये हे प्रमाण जास्त असून ३५ टक्के रुग्णांमध्ये लाँग कोव्हिडची लक्षणं आढळतात. आता ही लक्षणं नेमकी कशामुळे आढळतात, हे अजून स्पष्ट व्हायचं आहे. त्यावर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन सुरू आहे. कोरोनापाठोपाठ आलेल्या या आरोग्य संकटाचं नेमकं स्वरूप काय आणि त्याच्यापासून आपला बचाव करायचा असेल, तर काय करावं लागेल, हे जाणून घेणं आवश्यक ठरतं.

कोरोनानंतर तीन ते सहा महिन्यांत लाँग कोव्हिडची लक्षणं आढळू शकतात. आयसीयूमध्ये उपचार घेतलेल्या सुमारे ५० टक्के रुग्णांना लाँग कोव्हिडचा धोका असू शकतो. लाँग कोव्हिडच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने श्वास घेताना त्रास, ब्रेन फॉग, हृदयविकार, चक्कर येणं, हृदयाचे ठोके वाढणं, अचानक थकवा जाणवणं, दम लागणं, झोपेची समस्या आदींचा समावेश करता येईल. लाँग कोव्हिडची लक्षणं सर्वांमध्ये आढळतात, असंही नाही. रक्तदाब, हृदयविकार, डायबेटीस असे जोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळण्याची शक्यता अधिक असते. कोरोना टाळण्यासाठी आणि कोरोना उपचारकाळात काय काळजी घेतली पाहिजे, हे बहुतेक लोकांना माहिती आहे. मात्र, कोरोना होऊन गेल्यानंतर उद्भवणाऱ्या आरोग्याच्या संकटाला तोंड देताना घ्यावयाची काळजी आणि उपचारांचं स्वरूप याविषयी योग्य आरोग्यविषयक जाणीव निर्माण होण्याची गरज आहे. मुळात कोरोना होऊन गेल्यावर शरीरात होणाऱ्या बदलाकडे किंवा समस्यांकडे फार गांभीर्याने पाहिलं जात नाही. मात्र, या तक्रारींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तसंच सांगोपांगी सल्ले किंवा माहितीवर विसंबून स्वत: उपचार घेणं म्हणजे आपले प्राण धोक्यात घालण्यासारखं आहे. काही तक्रार जाणवत असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेणं कधीही चांगलं. कोरोनानंतरचे शरीरातील बदल मानसिक नसून तो विकारच आहे आणि त्याकडे वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असते.

वर उल्लेख केलेल्या लक्षणांमध्ये एक उल्लेख आहे तो ब्रेन फॉगचा. हिवाळ्यात पाहायला मिळणारा फॉग म्हणजे दाट धुकं, हे माहीत असतं. ब्रेन फॉग म्हणजे वैद्यकीय भाषेत नेहमीच्या गोष्टी एकाएकी विस्मरणात जाणं. हे रुग्ण अचानक नेहमीच्या गोष्टी विसरू लागतात. गाडीची चावी, पाकीट, मोबाईल अशा अनेक नेहमी हाताळल्या जाणाऱ्या वस्तू आपण कुठे ठेवल्या याचं विस्मरण होतं. मेंदूमध्ये ब्लॅक आऊट होऊन नेहमीच्या गोष्टी आपण विसरत असल्याचं जाणवायला लागतं. मानसिक एकाग्रतेची जास्त गरज अपेक्षित असणाऱ्या संगणक किंवा आयटी क्षेत्रात ब्रेन फॉगचा फटका जास्त तीव्रतेने जाणवत असल्याचं आढळतं. पूर्वीसारखी एकाग्रता नसल्याने कामावर परिणाम होत असल्याचं आज अनेकांना जाणवत आहे. यातल्या अनेकांवर तर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. ब्रेन फॉगमुळे वेळेत निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. या समस्येवर दोन प्रकारे उपचार करता येतात. त्यातली एक आपल्या जीवनशैलीशी आणि आपल्या खाण्याच्या शैलीशी निगडित आहे. दुसरा पर्याय, हा औषधोपचाराचा आहे. इथे वैद्यकीय तज्ज्ञ महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

कोरोना उपचारानंतर बऱ्याच जणांना आपला तोल जात असल्याचं जाणवतं. अनेकांना थोडंसं चाललं किंवा जीना चढताना-उतरताना दम लागत असल्याचं जाणवायला लागतं. अवसान गळल्यासारखं वाटतं. बऱ्याच जणांना हृदयाचे ठोके वाढत असल्याचं जाणवतं. साधारणपणे आपल्या हृदयाचे मिनिटाला ७२ ठोके पडतात. मात्र, अशा रुग्णांच्या हृदयाचे ठोके १०० ते ११० पर्यंत वाढल्याचं दिसतं. काही घटनांमध्ये, तर हृदयाचे ठोके १२० पर्यंत वाढलेले दिसतात. कधी-कधी तर हृदय छाती फोडून शरीराबाहेर पडतं की काय, असंही वाटू लागतं. अर्थात, औषधोपचाराद्वारे हे ठोके नियंत्रित करता येतात. त्याचबरोबर कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढल्याचं आढळून येत आहे. डायबेटीसग्रस्त रुग्णांना याचा अधिक धोका असल्याने अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोना काळातल्या उपचारानंतर अनेक घटनांमध्ये महिना-दीड महिन्यांनंतर रक्त घट्ट होऊन गुठळ्या झाल्याचं आढळलं आहे. त्यामुळे ब्लॉकेजचं प्रमाण वाढू शकतं.

युरोपमध्ये अशा प्रकारच्या घटनांचं प्रमाण अधिक आहे. या रुग्णांना उपचारावेळी रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा वापर करावा लागतो. हा त्रास त्या-त्या रुग्णानुसार कमी, अधिक प्रमाणात दीर्घकाळ जाणवू शकतो. अशा रुग्णांनी पल्मॉनॉलॉजिस्टचा सल्ला घेणं कधीही चांगलं. कोरोनोत्तर काळात डायबेटीस, कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना झाल्याने आयसीयूमध्ये उपचार घ्यावे लागलेल्यांना पल्मनरी फायब्रोसिसची समस्या जाणवू शकते. आयसीयूमध्ये उपचारावेळी स्टेरॉईर्डचा वापर अधिक झाल्यास शरीरावर त्याचेही दुष्परिणाम जाणवू लागतात. स्टेरॉईर्डच्या अतिवापरामुळे कोरोनानंतर डायबेटीस, म्युकर मायकोसिस, गॅस्ट्रॉयसिस, वेट गेन, व्होमिटिंग, नॉशिया आदी समस्यांना सामोरं जावं लागत आहे. श्वासात अडथळे येत असतील, तर वैद्यकीय सल्ल्यानुसार काही श्वसनतंत्राचा अवलंब, योगासनाचे काही प्रकार उपयुक्त ठरतात. श्वसनतंत्रासाठी प्राणायमातल्या काही प्रकारांची मदत होऊ शकते. श्वासोच्छ्वासाच्या उपचारांमध्ये फुप्फुसाची क्षमता वाढवण्यावर भर दिला जातो. त्याचबरोबर गरज पडल्यास औषधांद्वारे उपचारही करावे लागतात. अर्थात, ते श्वसन अडथळ्यातली तीव्रता आणि रुग्णाच्या उपचारांवरील प्रतिसादावर अवलंबून असतं.

कोरोना हा फुप्फुसाशी संबंधित विकार असल्यानं अनेक तक्रारी छातीशी निगडित आहेत. कोरोना केवळ फुप्फुसाशी संबंधित नसून त्याचा परिणाम शरीराच्या अन्य अवयवांवरही होत असल्याचं आढळत आहे. कोरोनानंतर आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे मनाचा खेळ म्हणून नव्हे, तर आरोग्याची तक्रार म्हणून पाहण्याची गरज आहे. कोरोना झाल्यानंतरच्या काळातल्या बदलांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. यामुळे वेळीच वैद्यकीय किंवा छातीविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं. कोरोनाने दिलेले अनुभव आणि ज्ञान हे काही काळापुरतं नाही. आपल्याला कोव्हिडसमवेत पुढील वीस-पंचवीस वर्षं काही तडजोडी कराव्या लागणार आहेत. लाँग कोव्हिडला पराभूत करण्यासाठी शरीरातल्या बदलांवर लक्षपूर्वक नजर ठेवणं, वेळीच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं, आवश्यक औषधोपचार सुरू करणं या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल, हे नक्की. लसीकरणावर भर आणि गंभीर स्वरूपाचा संसर्ग होऊ न देणं याची काळजी घेतली, तर लाँग कोविडची भीती राहणार नाही, हेही दखलपात्र.

Recent Posts

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

7 minutes ago

Curd: दह्यासोबत या गोष्टी खाल्या तर, पोटात विष तयार होईल!

मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…

31 minutes ago

Mahesh Babu : तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…

36 minutes ago

Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…

1 hour ago

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

2 hours ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

3 hours ago