बांगलादेश आणि वेस्ट इंडिजला विजय आवश्यक
शारजा (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील (ग्रुप १) शुक्रवारच्या (२९ ऑक्टोबर) पहिल्या सामन्यात गतविजेता वेस्ट इंडिज आणि बांगलादेश आमनेसामने आहेत. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी उभय संघांना विजय आवश्यक आहे.
वेस्ट इंडिजला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मात खावी लागली. बांगलादेशचा श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध पराभव झाला. गटवार साखळीतील आव्हान कायम राखण्यासाठी किमान तीन विजय आवश्यक आहेत. त्यामुळे आणखी एक पराभव बांगलादेश किंवा वेस्ट इंडिजला स्पर्धेबाहेर फेकू शकतो. त्यात बांगलादेशच्या तुलनेत विंडिजची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण ते गतविजेते आहेत.
सर्व आघाड्यांवरील खराब कामगिरी हे वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. इंग्लिश गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजची कागदावरील बलवान बॅटिंग पत्त्यांसारखी कोसळली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इविन लेविस आणि कर्णधार कायरॉन पोलार्डने थोडा प्रतिकार केला. मात्र, इंग्लंडविरुद्ध आव्हान कमी असूनही प्रभावी मारा करणाऱ्या गोलंदाजांनी निराशा केली. गतविजेत्यांची गोलंदाजी कमकुवत आहे. त्यामुळे फलंदाजीवर अधिक भिस्त आहे. परंतु, टी-ट्वेन्टीचा बादशहा ख्रिस गेलसह लेंडल सिमन्स, निकोलस पुरन, आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायर, ड्व्येन ब्राव्होला अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे फलंदाजी उंचावली, तरच विंडिजला विजयाची थोडी फार आशा बाळगता येईल.
बांगलादेशने श्रीलंकेला चांगलेच झुंजवले. मात्र, हाणामारीच्या षटकांत प्रतिस्पर्धी फलंदाज वरचढ ठरले. इंग्लंडविरुद्ध मात्र फलंदाजी ढेपाळली. मोहम्मद नईमसह मुशफिकुर रहिमने फलंदाजीत थोडा प्रभाव पाडला आहे. मात्र, कर्णधार महमुदुल्ला तसेच अष्टपैलू शाकीब अल् हसनने निराशा केली आहे. गोलंदाजीही तितकी प्रभावी नाही. त्यामुळे सांघिक कामगिरी उंचावली नाही तर बांगलादेशचे काही खरे नाही.
वेळ : दु. ३.३० वा.