संतोष वायंगणकर
महाराष्ट्रात पूर्वी कोकण जसे निसर्गसंपन्न म्हणून ओळखले जायचे तसे ते राज्य आणि ग्रामीण रस्तेही चांगले म्हणून एक ओळख होती. गावो-गावी विविध योजनांद्वारे रस्ते विकसित झाले; परंतु गेल्या काही वर्षांत ‘ ठेकेदार-कम-कार्यकर्ता’ ही कन्सेफ्ट आली आणि सारंच बिघडलं. पूर्वी स्वत:च्या खिशाला चाट देऊन काम करणारा तो कार्यकर्ता. एक काळ होता कार्यकर्त्याला साध्या वडापावची सुद्धा अपेक्षा नसायची. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला कोणतीच अपेक्षा नसायची. स्वत:च्या घरची चटणी-भाकरी घेऊन तो पक्षाचं काम करायचा. असं काम करताना त्याच्या पूर्णपणे निरपेक्ष भावना होत्या. मुळातच कोणत्याही माणसाने अपेक्षाच ठेवल्या नाहीत, तर कधीही अपेक्षाभंगाचे दु:ख येत नाही. अपेक्षा ठेवली की, दु:ख हे येणारच! पूर्वी या कार्यकर्त्याची अपेक्षाच नसायची. प्रामाणिक, निष्ठा, नि:स्वार्थपणा हे अशा साऱ्या शब्दांनाही एक वेगळं वजन होतं. बोलताना या शब्दांना एक वेगळं वलय होतं.
आता तर सारंच बदलंलय. कोकणात राजकीय विचार पाहता पूर्वी समाजवादी विचारांचा बराच पगडा होता. बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांच्या कार्यकाळात तर सायकलवर किंवा पायी फिरणारा कार्यकर्ता होता आणि तो प्रामाणिक या शब्दांशी जागणारा होतो. गेल्या काही वर्षांत कार्यकर्त्याचं स्वरूप फार बदलून गेलं. पक्ष आणि नेत्यांच्या आशीर्वादावर जे उभे राहतात, त्यांनाच आव्हान देण्याची भाषा करणारे दिसू लागले. हा सारा बदल गेल्या काही वर्षांतील आहे. या राजकीय, सामाजिक स्तरावर होणारे बदल, घडणाऱ्या घडामोडी यांचे परिणाम हे विकासप्रक्रियेत प्रतिबिंबित होत असतात. अलीकडे तर, कार्यकर्ता-कम-ठेकेदार या नव्या कन्सेफ्टमुळे कोकणातील रस्ते व प्रकल्प यांचा दर्जा शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. कोकणातील रस्त्यांच्या कामांची जी स्थिती आहे, ती पाहता सारे लक्षात येते. रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांच्या संख्येवरून रस्ता बनवणाऱ्या ठेकेदारांनी त्या रस्त्याचे काम कसे केले आहे, हे सहज समजून येते. कार्यकर्ता-कम-ठेकेदार हा काही कोणत्या एकाच राजकीय पक्षात नाही, तर तो सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहे. एकाच रस्त्यावर वारंवार जेव्हा देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करावा लागतो, तेव्हा त्या रस्त्याच्या कामांची स्थिती काय असेल, हे सांगण्यासाठी बांधकामांशी संबंधित कोणत्याही तांत्रिक तज्ज्ञाचीही आवश्यकत भासणार नाही. बांधकामांवर गुणवत्ता तपासणी विभाग आहे. तो विभाग त्यांचे अधिकारी कशाची तपासणी करतात? कोणते काम करतात? हेच खरे प्रश्न आहेत.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवरचे डांबर शोधावे लागेल. चाळीस वर्षांपूर्वी जसे धुळीने माखणारे रस्ते होते, त्याच पद्धतीने सध्याचे ‘डांबरीकरण केले’ म्हटले जाणारे रस्ते आहेत; परंतु जाग्यावर काहीच शिल्लक नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी आणला, असं म्हटलं जातं, तो रस्त्यांवर खर्च केला जातो, असंही सांगितलं जातं. हा पैसा जातो कुठे, याच्या हिशेबाची मांडणी कधीतरी व्हावी. सर्वसामान्य जनतेलाही कधीतरी हे समजण्याची आवश्यकता आहे. गेल्या दोन वर्षांत तर कोकणात बांधकाम विभागाकडे निधीच आलेला नाही, असे सांगितले जाते; परंतु जी काही रस्ते विकासाची बांधणीची कामे होत आहेत, त्याला कोणताही दर्जा नाही. कोणतेही काम करताना ते दर्जेदार करावयाचे असते, याचा विसरच अधिकारी आणि बांधकाम ठेकेदारांना पडलेला आहे. ‘आपण सारे भाऊ-भाऊ, मिळून सारे खाऊ’ असंच सारं काही सुरू आहे. यामुळे कोकणातील कोणत्याही रस्त्याचे काम दर्जेदार नाही.
पूर्वी ठेकेदारी हा व्यवसाय होता. आता तर तो ‘धंदा’ झाला आहे. बांधकाम ठेकेदारीत कामांच्या विक्रीचा मोठा धंदा चालतो. यातच बेनामी ठेकेदारीही तेजीत असते. किमान आपल्या व्यवसायात नाव खराब होऊ नये, असे वाटणारे कधी काळी या व्यवसायात होते. आता धंदेवाईकपणामुळे नाव खराब होण्याची, जपण्याची आवश्यकताच उरली नाही. रस्ते बांधणीच्या बाबतीत आहे, तीच स्थिती इतर काही विभागांतही आहे. कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. तिलारी पाटबंधारे प्रकल्पात अनेक राजकीय पक्ष, कार्यकर्ते, ठेकेदारांनी घळभरणीच्या नावाखाली स्वत:ची घरभरणी करून घेतली. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने पाटबंधारे प्रकल्पांच्या कामांची पूर्तता नाहीच. उलट दरवर्षी त्या प्रकल्पाच्या कामाचे बजेट वाढतच चालले आहे. कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांच्या निकृष्ट कामानेच चिपळूण जवळचे धरण फुटले, गावच पाण्याखाली गेले. यामुळे कोकणातील रस्ते, पाटबंधारे प्रकल्प यांच्या बांधकामांची चौकशी झाली पाहिजे. मग खऱ्या अर्थाने ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाईल. ठेकेदार-कम-कार्यकर्ता ही ठेकेदारीत आलेली ‘कीड’ आता थांबणार नाही. याचे कारण सारे प्रवासी एकाच नावेतले आहेत!