Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीवसई-विरारमधील सिग्नल नादुरुस्तच

वसई-विरारमधील सिग्नल नादुरुस्तच

कीर्ती केसरकर

नालासोपारा : गेल्या दोन वर्षांपासून सिग्नल यंत्रणांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वसईमध्ये सुरू आहेत. अजूनही त्यामध्ये दुरुस्ती झालेली नाही. सिग्नल केंद्रांमध्ये होणाऱ्या गोंधळामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी वाढली आहे. मुख्य रस्त्यांवरील सिग्नल सतत बंद असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे. शिवाय, वाहतूक कोंडीतही प्रचंड वाढ झालेली आहे.

वसई-विरार विकसित होत असताना येथे गर्दीही वाढत आहे. त्यामुळे शहराला वाढत्या वाहतूक कोंडीचा त्रास जाणवू लागला होता. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वसई तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र, दोन वर्षांपासून सिग्नल यंत्रणा योग्यरीत्या सुरू नाही. या संपूर्ण समस्येची चर्चा सुरू असली तरी यावर उपाययोजना मात्र केल्या जात नाहीत. गेल्या काही महिन्यांत आणखी काही मुख्य परिसरांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली; परंतु नवीन यंत्रणा बसवण्यात आली असली तरी जुन्या सिग्नलप्रमाणेच नवीन सिग्नल यंत्रणाही सतत बंद पडत आहे. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले असून वाहतूक कोंडीची परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडत चालली आहे. त्यातही वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याने वाहतुकीचे नियम मोडत वाहनचालक फिरत आहेत.

सिग्नल यंत्रणांच्या दुरुस्तीवर पालिका लक्ष देत नसल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात वाढले आहेत. याचबरोबर वसई विकसित होत असल्याने या ठिकाणी लोकसंख्यासुद्धा वाढत आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी सिग्नल यंत्रणेवर लक्ष देणे गरजेचे आहे. दररोज प्रवासाच्या वेळी सिग्नल यंत्रणांमध्ये बिघाड झालेला असतो. यामुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला तरीही वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये त्यात सुधारणा होत नसल्याचेच दिसते. अनेकदा विषय उचलण्यात आला तरीही सिग्नल बदलण्यात किंवा ते दुरुस्त करण्यात आले नाहीत. वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी बसवण्यात आलेले सिग्नल आता निकामी ठरत आहेत. तसेच, सतत बंद असणारे सिग्नल अधिकच वाहतूक कोंडी वाढवत आहेत. त्यामुळे या बिघडलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे वसई-विरारकर वाहनचालकांची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -