मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता फायर बाईकचा समावेश होणार आहे. मुंबईतील वाढत्या आगीच्या घटना रोखण्यासाठी या बाईकचा उपयोग केला जाणार असल्याच बोलले जात आहे. मात्र यापूर्वीच अयशस्वी ठरलेल्या फायर रोबोटनंतर फायर बाईक कशाला, असा सवाल विरोधकांकडून होत आहे.
मुंबईत झोपडपट्टी तसेच टोलेगंज इमारतींना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहत. नुकत्याच अविघ्न पार्क या इमारतीला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आता अग्निशमन दलाच्या ताफ्यात फायर बाईक सामील होणार आहेत. मुंबईतील अरुंद गल्ल्या, दाटीवाटीच्या वस्तीत आग विझवण्यासाठी मुंबई महापालिका फायर बाईक्सची खरेदी करणार आहे. आग विझवण्यासाठी ३ कोटी १५ लाखांच्या फायर बाईक्सचा महापालिकेचा नवा प्रस्ताव आहे. एका फायर बाईकची किंमत १ लाख २८ हजार आहे तर त्याच्यावरील फायर सिस्टीमसाठी, पाण्याच्या टाकीचा खर्च १० लाख २२ हजार आहे.
मात्र यापूर्वी महापालिकेने ७ कोटी खर्च करून फायर रोबोट आणला होता; मात्र हा रोबोट पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता फायर बाईक नक्की किती उपयुक्त ठरणार आहे, आणि आधीच ७ कोटी पाण्यात गेलेले असताना फायर बाईक कशाला? असा सवाल विरोधकांनी केला असून फायर बाईकचे प्रात्यक्षिक दाखवण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. या प्रस्तावावरील चर्चेत शिवसेना आणि विरोधकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
मुंबईत १४० इमारतींमध्ये अग्निसुरक्षा नाही
मुंबईतील तब्बल १४० इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याच धक्कादायक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाने जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत १५२६ इमारतींची तपासणी केली होती; यात अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेल्या ३२७ इमारतींना नोटीस बजावली होती. त्यापैकी ७८ ठिकाणी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे, तर १०९ ठिकाणी अग्निशमन यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी स्थायी समितीत दिली. मुंबईत दरवर्षी होणाऱ्या एका दुर्घटनांपैकी २५ टक्के दुर्घटना या आगीच्या असतात. ५ वर्षांत आगीच्या दुर्घटनांत मृत्यू होण्याचे प्रमाण घटले आहे.