Thursday, October 30, 2025
Happy Diwali

राणी बाग १ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी खुली

राणी बाग १ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी खुली

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीसाठी महापालिकेने बच्चे कंपनीला खास गिफ्ट दिले आहे. १ नोव्हेंबरपासून राणी बाग पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे. कोरोना काळात बंद असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सोमवारपासून नियमित वेळेनुसार पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर प्रभातफेरीसाठी येणाऱ्या नागरिकांकरिता सकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत प्राणिसंग्रहालय पुन्हा खुले करण्यात येत आहे.

कोरोनामध्ये काही वेळेसाठी राणीबाग सुरू करण्यात आली असली तरी मार्च २०२१ नंतर कोरोना रुग्ण पुन्हा वाढायला सुरुवात झाली आणि राणी बाग बंद करण्यात आली. मात्र आता १ नोव्हेंबरपासून राणी बाग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दरम्यान प्राणिसंग्रहालयातील तिकीट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्यात येईल. दिवसभरात किंवा सुट्टीच्या दिवशी प्राणिसंग्रहालयामध्ये जास्त प्रमाणात गर्दी झाल्यास कोरोना सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार पर्यटकांकरिता बंद करण्यात येणार असून तिकिट विक्री थांबविण्यात येईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान ज्येष्ठ नागरिक व ५ वर्षांखालील लहान मुलांना शक्यतो प्राणिसंग्रहालयात भेट देणे टाळावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

दरम्यान राणीबागेत प्रवेश घेण्यासाठी महापालिकेकडून कोरोना प्रतिबंधाचे नियम आखण्यात आले आहेत. यात राणीबागेत प्रवेश करताना व फिरताना मास्क अनिर्वाय असेल, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी राणी बागेत येणे टाळावे, तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, कमीत-कमी साहित्य आणावे. तसेच साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराजवळील हात निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) सुविधेचा उपयोग करावा, प्राणिसंग्रहालयात प्रवेश केल्यावर गर्दीने, समुहाने फिरू नये, कोविड विषाणुंचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये, प्राणिसंग्रहालयात केरकचरा इतरत्र टाकू नये व थुंकू नये, कचराकुंडीचा वापर करावा, या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा