Monday, June 30, 2025

आमच्यासोबत योग्य तो न्याय करा

आमच्यासोबत योग्य तो न्याय करा

क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना पत्र




मुंबई (प्रतिनिधी) : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबावर आरोप होत आहेत. या आरोपांमुळे त्रस्त झालेली समीर वानखेडे यांची पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘आमच्यासोबत योग्य तो न्याय करा,’ अशी मागणी क्रांतीनं मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात क्रांती रेडकर म्हणाली की, ‘मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करू नये हे त्या दोघांनी शिकवलं. तोच धडा घेऊन मी आज माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरुद्ध उभी आहे. लढते आहे. मी एक कलाकार आहे. राजकारण मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही.


आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रुची लख्तरं चारचौघात उधळली जात आहेत. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रिच्या प्रतिष्ठेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना नक्कीच हे पटलं नसतं. आज ते नाहीत पण तुम्ही आहात. त्यांची सावली, त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचं नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती.' असे क्रांती आपल्या पत्रात म्हणाली.

Comments
Add Comment