
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतील भंगार सामानाच्या लिलावात भंगार खरेदी डीलर्सचे रॅकेट सक्रिय असून यामुळे महापालिकेची लूट होत आहे. ठराविक डीलर्सचे मोठे रॅकेट गेली पन्नास वर्षापासून पालिकेत कार्यरत असून यात एकाच डीलर्सच्या नावावर अनेक कंपन्या आहेत आणि यामुळे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. याबाबत भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष भालचंद्र शिरसाट यांनी पालिका आयुक्त यांना पत्र लिहिले आहे.
या प्रकरणात आयुक्तांनी लक्ष घालून आधीच्या भंगार सामान लिलावाचा तपशील तपासावा तसेच मागील भंगार लिलावाची दक्षता विभागाकडून चौकशी करत मुख्य लेखा परीक्षकांकडून सदर भंगार निविदांचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणी देखील केली आहे. या भंगार लिलावात सहभागी होणाऱ्या कंपनीचा मालक एकच असून नवीन निविदाकारला यात संधी मिळत नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक तसेच पारदर्शकपणे होत नसून हा लिलाव करणारा आणि लिलावात सहभागी होणारा लाभार्थी या दोघांचाही पत्ता आणि मालकही सारखेच आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत एकाधिकारशाही चालत असल्याचेही शिरसाट यांनी म्हंटले आहे.
या लिलावात सहभागी होणाऱ्या स्क्रॅप डीलर कंपनीचा पत्ता एकाच ठिकाणी असून आश्चर्य म्हणजे या तीनही कंपन्या आपापसात कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धा करतात आणि कंत्राट गिळंकृत करतात. हे रॅकेट नवीन निविदाकाराला आतमध्ये शिरूच देत नाहीत. भंगाराच्या निविदांमध्ये स्पर्धा होऊ देत नाहीत. इतकेच नाही तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरून कोट्यवधींची लूट करत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.
सध्या महापालिका नवीन विजेवर चालणाऱ्या गाड्यांची खरेदी करत आहे, यामुळे जुन्या गाड्या भंगारात काढल्या जातील. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेला या रॅकेटमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. तरी पालिका आयुक्तांनी भंगार गाडी लिलाव करणाऱ्या कंपन्यांची तसेच लिलावात भाग घेणाऱ्या २१ कंपन्यांची दक्षता विभागातर्फे चौकशी करावी व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजपने केली.