Monday, July 1, 2024
Homeमहत्वाची बातमीआर्यन खान जामिनावर

आर्यन खान जामिनावर

किरण गोसावी पोलीस कोठडीत

मुंबई (प्रतिनिधी) : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान याला गुरुवारी मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असून आर्यन याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमून धामेचा यांनाही न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी जामीन मंजूर केला असून तिघांनाही हायकोर्टाने विशेष अटी घातल्या आहेत. याबाबतचा सविस्तर आदेश नंतर उपलब्ध होईल, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.

दरम्यान, जामीन आदेशाची प्रत उद्याच उपलब्ध होणार असल्याने आर्यनला गुरुवारची रात्रही आर्थर रोड तुरुंगातच काढावी लागणार आहे. त्यामुळे शुक्रवारी किंवा शनिवारी आर्यनची आर्थर रोड तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावी याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावींवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावींवर आहे.

यापूर्वी आर्यन, अरबाज आणि मुनमून या तिघांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर या तिघांनीही मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. तिघांच्याही जामीन अर्जांवर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. मंगळवार आणि बुधवारी ही सुनावणी अपूर्ण राहिली. त्यानंतर गुरूवारी ही सुनावणी पूर्ण झाली.

२६ दिवसांनी जामीन

कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकून आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धामेचा यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. आतापर्यंत एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन, अरबाज व मूनमून यांची जामिनासाठी धडपड सुरू होती. आर्यनसाठी सतीश मानेशिंदे, मुकुल रोहतगी हे बाजू मांडत होते. अखेर २६ व्या दिवशी आर्यनला जामीन मंजूर झाला. जामीन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी किंवा शनिवारी आर्यनची आर्थर रोड तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.

मागासवर्ग आयोगाकडे तक्रार

आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला त्रास दिला जात आहे, अशी तक्रार समीर वानखेडे यांनी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे केली आहे. आपण नागरी सेवेदरम्यान सादर केलेली प्रमाणपत्रे ही योग्य असून त्यामध्ये छेडछाड करण्यात आलेली नाही. जे आरोप केले जात आहेत, त्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार समीर यांनी मागासवर्गीय आयोगाकडे दिली आहे.

गोसावी विरोधात अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे

पुणे : एनसीबीचे पंच किरण गोसावी याच्याविरुद्ध ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. किरण गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. त्याचा तपास करायचा असल्याने किरण गोसावीची १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीने आर्यन खानला सोडवण्याच्या बदल्यात शाहरुख खानकडून २५ कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्याचा बॉडीगार्ड व पंच प्रभाकर साईल याने केला आहे.

पार्टी आयोजक खान, वानखेडेंचे मित्र

काशिद खान हा या पार्टीचा आयोजक असल्याचे सांगताना नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. काशिद खान हे समीर वानखेडे यांचे घनिष्ट मित्र असल्यानेच त्यांच्यावर वानखेडे यांनी कारवाई केलेली नाही, असा थेट आरोप मलिक यांनी केला आहे. काशिद खानवर कारवाई का केली नाही, याचे उत्तर वानखेडे यांच्याकडून हवे आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

वानखेडे यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : मुंबई पोलिसांकडून तपास पथक नेमण्यात आल्यानंतर अटकेची शक्यता लक्षात घेत समीर वानखेडे यांनी गुरुवारी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यांना अटक करण्याची गरज भासल्यास ७२ तास आधी नोटीस देण्यात यावी, असे निर्देश राज्य सरकार आणि पोलिसांना दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -