दुबई (वृत्तसंस्था) : गतविजेता वेस्ट इंडिजचा पाय खोलातच आहे. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर- १२ फेरीमध्ये ग्रुप १मधील दुसऱ्या लढतीत मंगळवारी त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून आठ विकेट आणि दहा चेंडू राखून मात खावी लागली. मध्यमगती गोलंदाज ड्वायेन प्रीटोरियससह (१७ धावांत ३ विकेट) बहरलेली आघाडी फळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघानी दमदार कमबॅक केले.
दक्षिण आफ्रिकेने प्रतिस्पर्ध्यांचे १४४ धावांचे आव्हान १८.२ षटकांत २ विकेटच्या बदल्यात पार केले. आयडन मर्करम (२६ चेंडूंत नाबाद ५१ धावा) तसेच रॉसी वॅन डर ड्युसेनने (५१ चेंडूंत नाबाद ४३ धावा) तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची नाबाद भागीदारी करताना संघाला १९व्या षटकातच विजय मिळवून दिली. मर्करमने नाबाद हाफ सेंच्युरीमध्ये २ चौकार आणि ४ षटकार ठोकले. वॅन डर ड्युसेनने ३ चौकार मारले. मर्करम आणि वॅन डर ड्युसेनने मोठी भागीदारी करताना विजय सुकर केला तरी दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच षटकात धक्का बसला. कर्णधर टेम्बा बवुमा धावचीत होत तंबूत परतला. त्याला केवळ दोन धावा करता आल्या. त्यानंतर दुसरा सलामीवीर रीझा हेन्ड्रिकने (३० चेंडूंत ३९ धावा) रॉसी वॅन डर ड्युसेनसह दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावा जोडताना डाव सावरला.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १४३ धावांची मजल मारता आली. सलामीवीर इविन लेविसने ३५ चेंडूंत ५६ धावांची चमकदार खेळी केली तरी त्याला अन्य सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ लाभली नाही. लेविसनंतर सर्वाधिक २६ धावा कर्णधार कीरॉन पोलार्डच्या आहेत. लेविसने त्याच्या झटपट अर्धशतकासाठी ३ चौकार आणि ६ षटकार ठोकले. पोलार्डने २ चौकार आणि एका षटकार मारले.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक मारा केल्याने पहिल्या पाच षटकांत प्रतिस्पर्धी संघांच्या ओपनर्सना पहिल्या दहा षटकात बिनबाद ६६ धावा जमवता आल्या. तरीही लेविसने एक बाजू लावून धरताना लेंडल सिमन्ससह (१६ धावा) दमदार ७३ धावांची सलामी दिली. त्यात लेविसचा ५६ धावांचा वाटा होता. फिरकीपटू केशव महाराजने कॅगिसो रबाडाकरवी झेलबाद करताना संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरन आणि फटकेबाज ख्रिस गेललाही सूर गवसला नाही. केशव महाराजच्या गोलंदाजीवर पूरन बाद झाला. त्याने १२ धावा केल्या. ख्रिस गेलला १२ चेंडूंत तितक्याच धावा करता आल्या.
ड्वायेन प्रीटोरियसच्या गोलंदाजीवर हेन्रिच क्लासेनने त्याचा झेल घेतला. आंद्रे रसेलच्या रूपाने वेस्ट इंडिजला पाचवा धक्का बसला. अॅन्रिचच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. त्यानंतर आलेला शिमरॉन हेटमायरही धावचीत झाला. त्याने २ चेंडूंत १ धाव केली. पोलार्डने आक्रमक पवित्रा घेतला तरी त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने २० चेंडूंत २६ धावा केल्या. त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर हेडन वॉल्श बाद झाला.
गतविजेत्यांविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉकला आराम देण्यात आला आहे. वैयक्तिक कारणास्तव तो खेळत नसल्याचे कर्णधार टेम्बा बवुमाने सामना सुरू होण्यापूर्वी सांगितले. डी कॉकच्या जागी संघात रीझा हेन्ड्रिकला संधी मिळाली.
कर्णधाराचे अपयश झाकले जातेय
दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन केले तरी त्यांचा कर्णधार टेंबा बवुमाचे अपयश झाकले जात आहे. डावाची सुरुवात करण्याचा प्रयोग करणाऱ्या बवुमाला वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ २ धावा करता आल्या. सलामीला ऑस्ट्रेिलयाविरुद्ध १२ धावा केल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध आघाडी फळीचे अन्य फलंदाज खेळल्याने बवुमाचा बॅडपॅच जाणवला नाही.