
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे
वास्तविक समाजमाध्यमातून आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, माहिती होतात. या प्लॅटफॉर्मचा सुयोग्य वापर करता आला, तर आपण खूप काही आत्मसात करू शकतो. आपण जॉइन केलेल्या किंवा आपल्याला अॅड केल्या गेलेल्या ग्रुपमधील सर्व व्यक्तींचा आपल्याला परिचय नसतो. फारफार तर ग्रुप अॅडमिनला आपण थोडंफार ओळखत असतो. ग्रुपमध्ये कोणाचेही बॅकग्राऊंड, ठावठिकाणा, उद्योग-व्यवसाय आपल्याला माहिती नसतो. अशा परिस्थितीमध्ये देखील महिला खूपच बेसावध पद्धतीने ग्रुपवर वावरताना दिसतात.
समाजमाध्यम, त्यातून निर्माण झालेली प्रेमप्रकरण आणि महिलांची झालेली भावनिक कोंडी अथवा हार ही गुंतागुंतीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक सत्य घटना या ठिकाणी मांडणार आहे.
स्वाती (काल्पनिक नाव) व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून तिला तिचा जुना महाविद्यालयीन वर्गमित्र तुषार (काल्पनिक नाव) भेटला. तुषारबद्दल बऱ्यापैकी माहिती असल्यामुळे स्वातीने थोड्याच अवधीत त्याच्याकडून प्रेमाबद्दल झालेल्या विचारणेला होकार दिला. दोघेही विवाहित होते आणि वेल सेटल होते. दोघांनी एकमेकांच्या जवळ येण्याची तयारी दाखवली आणि ऑनलाइन प्रेमात चॅटिंग करणे, एकमेकांच्या फोटोची देवाण-घेवाण करणे, कुठे भेटायचं, कसं भेटायचं, कधी कुठे फिरायला जायचं यांसारख्या बाबींवर चर्चा व्हायची. व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणे, बघणे जमेल तसे सुरू होते. ऑनलाइन पद्धतीनेच स्वातीने आपलं सर्वस्व तुषारला अर्पण केलेलं होतं. तिला ठाम विश्वास होता की, तुषार प्रत्यक्षात देखील तिच्या जीवनात आहे आणि कायम असणार आहे. ते लवकरच प्रत्यक्ष भेटणार, बोलणार आणि जसे चॅटिंगमध्ये बोलतो तसेच प्रत्यक्ष सगळं आपल्या आयुष्यात होणार, अशी अपेक्षा स्वाती ठेऊन होती.
स्वाती तुषारच्या प्रेमात आकंठ बुडाली होती आणि त्याच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ, आतुरता तिला अस्वस्थ करत होती. त्यामुळे तिच्यामार्फत तुषारला सतत भेटीची विचारणा होत होती. तुषार मात्र तिला ऑनलाइन प्रेमातच खेळवत होता. तरी, आज ना उद्या आपल्या जीवनात तुषार नक्कीच आहे आणि कायम असेल या भरवशावर ती त्याला मागेल तसे फोटो, व्हीडिओ, मेसेज पाठवत होती. तोही त्यावर भरभरून दाद देत होता. त्यामुळे स्वाती त्यात समाधान मानत होती. कालांतराने तुषार मधे मधे गायब होऊ लागला, मधेच तिला ब्लॉक करणे, ब्लॅक लिस्टला टाकणे, असं देखील व्हायचे. कामात होतो, बाहेर गावी होतो, आजारी होतो, घरी होतो अशी कारणं सांगून तो तिला टाळायचा. स्वातीला मात्र तो एकदिवस जरी बोलला नाही तरी, अस्वस्थ होणं, घालमेल होणं असे परिणाम जाणवत होते.
हे सर्व स्वातीने सांगितल्यावर तिला विचारलं किती दिवसांपासून सुरू आहे हे ऑनलाइन प्रेम? तिने सांगितलं तीन वर्षांपासून! उत्तर ऐकून कोणालाही धक्का बसेल. किती दिवस एखादी बाई वेड्यात निघू शकते आणि किती दिवस एखादा पुरुष बाईला वेड्यात काढू शकतो, याचं मूर्तिमंंत उदाहरण म्हणजे तुषार आणि स्वाती असच वाटून गेलं. स्वातीने पुढे सांगितले की, तिने तीन वर्षांत अनेकवेळा तुषारकडे प्रत्यक्ष भेटण्याची, शारीरिक दृष्टीने एकत्र येण्याची, बोलण्याची, असलेलं प्रेम खऱ्या अर्थाने जगण्याची, अनुभवण्याची विनंती केली होती. दरवेळी तुषारने तिच्या पदरात निराशा टाकली होती. स्वाती तुषारप्रति इतकी समरस होती की, ती त्याच्याशिवाय जगणं अशक्य समजत होती. का टाळत होता तुषार तिला भेटायला? ज्या गोष्टी तो फोनवर बोलू शकत होता, पाहू शकत होता, त्या प्रत्यक्षात अनुभवायची त्याची तयारी का नसावी? फक्त ऑनलाइन प्रेमाच्या गप्पा मारणं, एकमेकांना नको त्या अवस्थेत ऑनलाइन बघणं, हा प्रेमप्रकरणांचा नवा प्रकार कधीपासून उदयाला आला? काय साध्य होत आहे अशा प्रेमप्रकरणातून? तुषारला स्वतःला यात आनंद वाटत असला तरी, स्वातीचा त्याने विचार का केला नाही? तुषारला प्रत्यक्ष भेटण्यात, नातेसंबंध कायमस्वरूपी टिकवण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता, तर त्याने स्वातीला असं आशेला लावणं योग्य आहे का? त्याला विवाहबाह्य संबंधातील रिस्क नको होती? की प्रत्यक्ष भेटीगाठीसाठी त्याची मानसिक, आर्थिक तयारी नव्हती? की स्वातीच्या भावभावनांपेक्षा त्याला स्वतःची प्रतिष्ठा जास्तच महत्त्वाची होती? की तो स्वातीचा वापर फक्त टाइमपास म्हणून करीत होता?
स्वातीसारखं बेभरोशी केलेलं प्रेम, गुंतवलेली भावना, समर्पण महिलेसाठी किती त्रासदायक होते याची थोडीही जाणीव पुरुषाला नसावी का? अशा पुरुषांना जे पाहणं आवडतं, अथवा त्यांचं मनोरंजन होऊ शकतं अशा अनेक गोष्टी इंटरनेटवर फुकटात आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत; परंतु वास्तविक जीवनात जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला तुमच्या मागणीनुसार अतिशय खासगी असे सर्व काही पाठवत राहाते, सगळ्या मर्यादा विसरून जाते, तुमच्याशी बोलत राहाते, तेव्हा स्त्रीच्या भावना त्याच्यात अडकलेल्या असतात. त्यातून तिलाही काही अपेक्षा असतात. तिने त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो.
महिलांनी स्वतःलाच अशा प्रकरणात गुंतू न देणे रास्त राहील, असे वाटते. कारण सोशल मीडियाचा वापर करताना जो काही प्रोटोकॉल आपल्याकडून किंवा समोरच्याकडून वेळीच पाळला गेला नाही, तर असा भावनांचा ऑनलाइन खेळ सुरू होतो आणि मग प्रेमात पडायला वेळ लागत नाही. आपण कोणताही विचार न करता पाठवलेले इमोजी, विविध इमेज, वैशिष्ट्यपूर्ण चित्र समोरच्याच्या मनात काय विचार आणि भावना निर्माण करतात याची जाणीव महिलांनी तसेच पुरुषांनी देखील ठेवणे आवश्यक आहे. अनेकदा पुरुष देखील चुकीचा हेतू ठेऊन संबंध प्रस्थापित करणाऱ्या महिलांना प्रमाणापेक्षा जास्त प्रतिसाद देऊन स्वतःच्या समस्या वाढून घेतात.