सोनू शिंदे
उल्हासनगर : उल्हासनगरमधील नामांकित गोल मैदानाची दुरवस्था झाल्याने या परिसरातील विद्यार्थ्यांना दिवाळीत खेळ खेळायचा कुठे? असा प्रश्न करत क्रीडा सभापती गीता साधनानी आणि समाजसेवक मनोज साधनानी यांनी थेट आयुक्त राजा दयानिधी यांना लक्ष्य केले आहे.
उल्हासनगर कॅम्प दोन परिसरात हे गोलमैदान आहे. ह्या गोलमैदानच्या छोटासा भाग हा मैदानी खेळ खेळण्यासाठी होता. मात्र हे मैदान रस्त्यापासून २ फूट खड्ड्यात असल्यामुळे मैदानात पावसाचे पाणी भरते. त्यामुळे चिखल होतो. या चिखलामुळे मैदानात मोठमोठे खड्डे पडतात. ह्या खड्ड्यांमध्ये डेब्रिज भरून हे खड्डे भरले जातात, यामुळे मैदानाची अवस्था आणखीच बिकट होते.
डेब्रिजच्या कचऱ्यात क्रिकेट खेळायचे कसे, असा प्रश्न खेळाडूंना पडला आहे. सभापती साधनानी यांनी गोल मैदानाचा कायापालट करण्यासाठी आयुक्तांकडे मागणी केली होती. त्याला आयुक्त राजा दयानिधी यांनी मान्यता दिल्यानंतर २ कोटी ८५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र हे काम शेवटच्या टप्प्यात असताना आयुक्तांच्या एका सहीसाठी निविदा प्रक्रिया रखडली असल्याचे समाजसेवक मनोज साधनानी यांनी सांगितले.
परिसरात हे एकमेव मैदान असल्याने मैदानाचे तत्काळ काम सुरू करा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असेही साधनानी म्हणाले. या कामात स्टेजचे सुंदरीकरण, क्रिकेट पिच, मिनी स्टेडियम, हाय मास्क लाईट्स, जॉगिंग ट्रक, प्रवेशद्वार सुंदरीकरण या कामाचा समावेश असल्याचे साधनानी यांनी सांगितले.