Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीमहापालिका, नगर परिषदांच्या सदस्यसंख्येत १७ टक्क्यांनी वाढ

महापालिका, नगर परिषदांच्या सदस्यसंख्येत १७ टक्क्यांनी वाढ

मुंबई – राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकासयोजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन मुंबई महापालिका वगळता इतर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान १७ व कमाल ६५ इतकी आहे. महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर निर्धारित आहे. कोवीड-१९च्या प्रार्दुभावामुळे २०२१च्या जनगणनेस आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरून महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महानगरपालिकांमध्ये ३ लाखांपेक्षा अधिक व ६ लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ७६ व अधिकत्तम संख्या ९६पेक्षा अधिक नसेल. ६ लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ९६ व अधिकत्तम संख्या १२६पेक्षा अधिक नसेल. १२ लाखांपेक्षा अधिक व १४ लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १२६ व अधिकत्तम संख्या १५६पेक्षा अधिक नसेल. २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १५६ व अधिकत्तम संख्या १६८पेक्षा अधिक नसेल. ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १६८ व अधिकत्तम संख्या १८५पेक्षा अधिक नसेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -