मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्या कामात समन्वयाचा अभाव असल्यामुळे राज्यातल्या शाळांना दिवाळीच्या सुट्ट्यांचे दोन वेगेवगळे कालावधी जाहीर झाले असून त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक मात्र गोंधळात पडले आहेत.
दिवाळीसाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक (उत्तर,पश्चिम, दक्षिण) कार्यालयाने १ ते २० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सुट्टीची सूचना देण्यात आली आहे. या सुट्टीमुळेच ३० ऑक्टोबरपर्यंत सत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत.
मात्र, राजेंद्र पवार, सह सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या सहीने बुधवारी काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार दिवाळी सुट्टीच्या कालावधीत २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. विद्यार्थी व पालकांनी मूळगावी जाण्यासाठी केलेले नियोजनही बिघडणार आहे.
शिक्षक भारती संघटनेने शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एका पत्राद्वारे दिवाळी सुट्टीचा कालावधी ऐनवेळी न बदलता पूर्ववत ठेवावा, अशी मागणी केली आहे. शिक्षण विभागातील अधिकारी १ ते २० नोव्हेंबर असा सुट्टीचा कालावधी जाहीर करतात आणि ऐनवेळी मंत्रालयातून सुट्टी कालावधीत बदल केला जातो. हा काय प्रकार आहे? या प्रकरणाने पुन्हा एकदा शिक्षण विभागातील सावळागोंधळ समोर आला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
शिक्षण विभागाने जाहीर केल्यानुसार राज्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मूळगावी/परगावी जाण्याचे आरक्षण केले आहे. ऐनवेळी सुट्टी कालावधीत बदल केल्यास सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागेल. शिक्षक भारती संघटनेने दिवाळीची सुट्टी पूर्ववत ठेवण्याची मागणी केली आहे, असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.