अबुधाबी (वृत्तसंस्था) : फॉर्मात असलेल्या इंग्लंडने बांगलादेशवर ८ विकेट आणि ३५ चेंडू राखून विजय मिळवत आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये सुपर-१२ फेरीमध्ये सलग दुसरा नोंदवला. दुसरीकडे, सलग दुसऱ्या पराभवामुळे बांगलादेशचा पुढील प्रवास बिकट झाला आहे.
बांगलादेशचे १२५ धावांचे आव्हान इंग्लंडने २ विकेटच्या बदल्यात १४.१ षटकांत पार केले. त्यात सलामीवीर जेसन रॉयचे मोठे योगदान राहिले. त्याने ३८ चेंडूंत ६१ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. रॉयने वैयक्तिक खेळ उंचावताना जोस बटलरसह (१८ चेंडूंत १९ धावा) सलामीसाठी ३९ धावा जोडल्या. त्यानंतर डॅविन मालनसह (२५ चेंडूंत नाबाद २८ धावा) दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावा जोडताना विजयाचे सोपस्कार पार पाडले.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणऱ्या बांगलादेशला २० षटकांत ९ बाद १२४ धावांमध्ये रोखण्यात इंग्लंडला यश आले. त्यांच्याकडून मुशफिकुर रहिमने सर्वाधिक २९ धावा केल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सने तीन विकेट घेत प्रभाव पाडला. त्याला ऑफस्पिनर मोईन अली तसेच लियाम लिव्हिंगस्टोनची (प्रत्येकी २ विकेट) चांगली साथ लाभली.
बांगलादेशला तिसऱ्या षटकात दोन धक्के बसले. मोइन अलीच्या सलग दोन चेंडूंवर दोन गडी बाद झाले. लिटन दास आणि मोहम्मद नइम बाद झाल्याने संघावर दडपण आलं. लिटनने ८ चेंडूंत ९ तर मोहम्मद नइमने ७ चेंडूंत धावा केल्या. यानंतर मैदानात आलेला शाकीब अल हसनही तग धरू शकला नाही. ख्रिस व्होक्सच्या गोलंदाजीवर अदिल राशीदने त्याचा झेल घेतला.
संघाची अवस्था बिकट असताना मुशफिकुर आणि महमुद्दुल्लाह यांनी डाव सावरला. मात्र दोघांना मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आलं. मुशफिकुर रहिम २९ धावांवर असताना लिव्हिंगस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानतर लगेचच होसैन ५ धावा करून तंबूत परतला. महमुद्दुल्ला १९, नुरुल हसन १६, महेदी हसन ११, मुस्तफिझुर रहमान ० धावा करून बाद झाले.