Thursday, April 24, 2025
Homeक्रीडाविक्रमी बोलींवरून क्रिकेटची जगभरातील लोकप्रियता अधोरेखित

विक्रमी बोलींवरून क्रिकेटची जगभरातील लोकप्रियता अधोरेखित

आयपीएल संघांच्या लिलावावर शेन वॉर्नचे भाष्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या पुढील हंगामासाठी (२०२२) लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांना लागलेल्या विक्रमी बोलीवरून क्रिकेटची लोकप्रियता अधोरेखित होते, असे ऑस्ट्रेलियाचा माजी महान लेगस्पिनर शेन वॉर्नने म्हटले आहे.

लखनऊ संघासाठी संजीव गोएंका यांच्या आरपीएसजी समूहाने तब्बल ७,०९० कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावत लखनऊ संघाची मालकी मिळवली. तसेच सीव्हीसी कॅपिटलने ५,६२५ कोटी रुपयांच्या बोलीसह दुसऱ्या संघाची मालकी मिळवताना घरचे मैदान म्हणून अहमदाबादला पसंती दिली.

दोन्ही नव्या संघमालकांचे मन:पूर्वक अभिनंदन. लखनऊ आणि अहमदाबाद संघांसाठी विक्रमी बोली लागली. क्रिकेट हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रसिद्ध खेळ का आहे, हे या बोलीवरून स्पष्ट होते, असे वॉर्नने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

आयपीएलमधील नव्या संघांवर मिळून १० हजार कोटी रुपयांपर्यंतची बोली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) अपेक्षित होती. मात्र, आरपीएसजी आणि सीव्हीसी यांनी मिळून तब्बल १२,७१५ कोटी रुपये (साधारण १.७ बिलियन डॉलर) खर्ची करत संघ विकत घेतले. दुबईत झालेल्या लिलावात एकूण १० समूहांनी (फ्रँचायझी) संघांच्या खरेदीसाठी दावेदारी पेश केली होती. इंग्लंडमधील फुटबॉल संघ मँचेस्टर युनायटेडच्या मालकांसह अदानी समूहानेही या संघांसाठी बोली नोंदवली. लिलावात भाग घेतलेल्या समूहांना अहमदाबाद, लखनऊ, कटक, धरमशाला, गुवाहाटी आणि इंदूर यांच्यापैकी एका शहराची निवड करण्याची मुभा देण्यात आली होती.

गौतम अदानींची ५१०० कोटींची बोली

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एक गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहाने संघ खरेदी करण्यासाठी ५१०० कोटी रुपयांची बोली लावली, पण ती अपुरी ठरली.

पुढील हंगामात ७४ सामने

आयपीएलच्या पुढील म्हणजेच १५व्या हंगामात एकूण १० संघ खेळणार असून ७४ सामने होतील. प्रत्येक संघ सात सामने घरच्या आणि सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळेल. आयपीएलमध्ये १० संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्पर्धेचे स्वरूप २०११ च्या मॉडेलचे अनुसरण करेल. यात साधारणपणे घर आणि बाहेरचे स्वरूप असेल, ज्यामध्ये ७४ सामने असतील. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये ६० सामने खेळले गेले जात आहे.

२०११च्या हंगामाप्रमाणे फॉरमॅट

२०११मध्ये १० संघांचे दोन भाग करण्यात आले आणि स्पर्धेच्या साखळी टप्प्यात ७० सामने खेळले गेले तर चार प्लेऑफ सामने खेळले गेले. साखळी टप्प्यात सर्व संघ १४ सामने खेळले. प्रत्येक संघ त्याच्या गटातील इतर चार घरच्या मैदानावर आणि बाहेरच्या मैदानावर (आठ सामने) खेळले. गटाची रचना ड्रॉद्वारे निश्चित केली जाईल आणि कोण किंवा कोणाशी एकदा किंवा दोनदा स्पर्धा करेल हे देखील ठरवले जाईल. आयपीएलमध्ये शेवटच्या वेळी आठपेक्षा जास्त संघ २०१३ मध्ये खेळले होते, जिथे ९ संघांनी भाग घेतला आणि एकूण ७६ सामने खेळले गेले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -