Wednesday, September 17, 2025

एसटीचा प्रवास महागला

एसटीचा प्रवास महागला

रातराणी गाड्यांच्या तिकीट दरात ५ ते १० रुपयांनी कपात करत थोडा दिलासा

मध्यरात्रीपासून १७.१७ टक्के भाडेवाढ लागू

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह राज्यात भाडेवाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. एसटीची ही भाडेवाढ १७ टक्के असून मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नुकतीच दरवाढ केली होती. त्यानंतर एसटी महामंडळाकडूनही दरवाढीबाबत विचार केला जात होता. या पार्श्वभूमीवर अखेर महामंडळाने मध्यरात्रीपासून तिकिटांचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलसह अन्य गोष्टी महाग झाल्याने आधीच सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. अशातच आता एसटीचा प्रवासही महागणार आहे. तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव पाठवला होता. एसटीच्या या प्रस्तावाला सरकारकडून आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या निर्णयामुळे दिवाळीपूर्वीच एसटी प्रवाशांचे ‘दिवाळे’ वाजले असल्याची चर्चा आहे.

इंधनाच्या दरात झालेली भरमसाट वाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू असणार आहे. सोमवार २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होत असून ती किमान ५ रुपये इतकी असणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रुपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र दिलासा दिला आहे.

गेल्या ३ वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी अनेक दिवस प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. नव्या तिकीट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयांच्या पटीत असून २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

तसेच २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून वा तद्नंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित दराने तिकीट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे अशा प्रवाशांकडून संबंधित वाहक सुधारित तिकिटाच्या रकमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. तथापि, रातराणी सेवा प्रकारांतर्गत रात्री धावणाऱ्या (जी सेवा सायंकाळी ७ वा. ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वा.पर्यंतच्या कालावधीमध्ये कमीत कमी ६ तास धावते) साध्या बसेसचे तिकीट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकीट दराच्या तुलनेत १८ टक्के जास्त होते. तथापि, सदर अतिरिक्त दर रद्द करण्यात आले असून दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचा तिकिट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून राज्यातील परिवहन बस तोट्यात होती. कर्मचाऱ्यांच्या पगारीही वेळेवर होत नव्हत्या. एसटी प्रशासन तोट्यात असण्याचे एक कारण म्हणजे ज्या प्रमाणात डीझेलच्या किंमती वाढल्या होत्या त्याप्रमाणात तिकीट दर वाढले नव्हते.

Comments
Add Comment