जव्हार (वार्ताहर) : जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम पिंपळशेत ग्रामपंचायतीमधील पागीपाडा येथील माया सुरेश चौधरी (२१) या आदिवासी पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेला शेतात काम करताना सर्पदंश झाला होता. तिचा पती व नातेवाइकांनी तातडीने डोली करून दोन किलोमीटर अंतरावरच्या पिंपळशेत आरोग्य पथकात मायाला नेण्यात आले. मात्र, तेथे तिच्यावर उपचार करणारा जबाबदार वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचारी उपलब्ध नसल्याने अखेर मायाचा तेथेच मृत्यू झाला. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्याने संपूर्ण जव्हार तालुक्यात आरोग्य यंत्रणेविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
अतिदुर्गम जव्हारमधील पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायतीमधील नागरिकांना रस्ता, वीज, पाणी आणि आरोग्याच्या समस्येने स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही ग्रासलेले आहे.
येथे वैद्यकीय उपचारांअभावी आजपर्यंत शेकडो बळी गेले आहेत. अशीच घटना पुन्हा शनिवारी घडली आहे. पागीपाडा येथील माया सुरेश चौधरी (२१) ही आदिवासी गर्भवती महिला दुपारी शेतात काम करताना तिला विषारी सापाने दंश केला.
मायाच्या पती व नातेवाइकांनी तिला डोली करून दोन किलोमीटर पायपीट करत पिंपळशेत आरोग्य पथकात उपचारासाठी आणले. मात्र, तेथे तिच्यावर उपचार करणारे कोणीही उपलब्ध नव्हते. केवळ एक शिपाई होता. अखेर तेथेच मायाचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे.
साप, विंचू चावल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचारांसाठी पुरेसा औषधसाठा नसतो. तसेच, पिंपळशेत आरोग्य पथक येथे रिक्त पदे असल्याने व तिथे कर्मचारी राहत नसल्याने अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी. – तुळशीराम भोवर, सामाजिक कार्यकर्ते
पालघर जिल्ह्याऐवजी जव्हार जिल्हा झाला असता, तर आरोग्य सुविधा सुधारली असती. येथील नागरिकांचे आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे जाणारे बळी थांबण्यासाठी आरोग्य विभागात कर्मचारी भरती होणे गरजेचे आहे. शिवाय, पालघर जिल्हा तसेच जव्हार तालुका आरोग्य विभागाकडून भरती होईपर्यंत व्यवस्था होणे अपेक्षित आहे. – कैलास घाटाळ, मनसे, जव्हार तालुका सचिव
या ठिकाणी जे कर्मचारी कामावर नव्हते, त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. – डॉ. किरण पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, जव्हार