श्रीनगर (वृत्तसंस्था) : ‘आपल्याला टोमणे मारले गेले आणि शाप दिला. भारत सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी, असा सल्ला फारुख अब्दुल्ला यांनी दिला. पण चर्चाच करायची असेल, तर आम्ही काश्मीर खोऱ्यातील जनतेशी आणि तरुणांशी करू, त्यांच्याशी बोलू’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. जम्मू -काश्मीर दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी अमित शहा यांनी सोमवारी श्रीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले.
‘जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. काश्मीर खोऱ्याचा आणि लडाखचा विकास व्हावा, याच उद्देशाने पावले उचलण्यात आली आहेत. काश्मीरला जे हवे आहे ते २०२४ पूर्वी सर्वांच्या डोळ्यांसमोर असेल. काश्मीर खोऱ्यातील नागरिकांनी मनातील भीती काढून टाकावी. काश्मीरची शांतता आणि विकासाच्या मार्गात कोणीही अडथळा आणू शकत नाही. त्यासाठी तुम्ही भारत सरकारवर आणि आमच्यावर विश्वास ठेवा’, असे शहा म्हणाले.
‘देशावर जितका अधिकार माझा आहे, तितकाच अधिकार काश्मीरच्या जनतेचा आहे. काश्मीर पंतप्रधान मोदींच्या हृदयात आहे. आम्हाला काश्मीर खोऱ्यातील तरुणांशी मैत्री हवी आहे. काश्मीरच्या विकासात अडथळे आणणाऱ्यांचा हेतू वाईट आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वप्रथम १०० टक्के लसीकरण करण्यात आले. आता तुमच्यापैकी कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो’, असे आवाहन शहांनी केले.
‘गेल्या ७० वर्षांपासून तुम्हाला अधिकारांपासून का वंचित ठेवले गेले? काश्मीरच्या तरुणांनी दगड उचलू नये, अशी आमची इच्छा आहे. काश्मीरला स्वतःचा मुख्यमंत्री असावा, जो लंडनला जाणार नाही. काश्मीरमधील तरुणांची दिशाभूल केली जात आहे. काश्मीरमधील तरुणांना ७० वर्षांपासून जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्याचा अधिकार का दिला गेला नाही?’, असे सवाल शहा यांनी तत्कालीन सरकारला केले आहेत.