लसीकरण झालेल्यांनाच प्रवासाची मुभा
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून अनेक गोष्टींवरील बंधने हटविण्यात आली आहेत. मात्र, मुंबईत लोकलच्या मर्यादित फेऱ्या सुरू होत्या. आता गुरूवार २८ ऑक्टोबरपासून सर्व लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने सर्व १०० टक्के लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सध्या ९५ टक्के लोकल फेऱ्या सुरू आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, मध्य आणि पश्चिम रेल्वेने १०० टक्के लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरीही राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रवाशांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे आगामी काळातही मुंबईत लोकल प्रवासासाठी हीच अट लागू असणार आहे.