पालघर (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारातील गर्दी दिवसेंदिवस वाढत असून लोकांमध्ये असलेली कोरोनाची भीती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत अनेक बाजार गर्दीने फुलून गेले आहेत. त्यामुळे प्रशासन चिंतेत सापडले आहे.
दिवाळी उंबरठ्यावर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दैनंदिन बाजार, आठवडे बाजार, शॉपिंग सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. कपडे, आकाश कंदील, रांगोळी, पणत्या, दिवाळी फराळाचे साहित्य, फटाके, मिणमिणत्या लाईटची तोरणे अशा वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत.
गेल्या वर्षी ऐन दिवाळीत कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यामुळे दिवाळी सण साजरा करण्यावर बंधने आली होती. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे हा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासूनच बाजारात गर्दी होऊ लागली आहे; परंतु, नागरिक मात्र कोरोनाचे कोणतेही नियम पाळत नसल्यामुळे प्रशासन चिंतेत सापडले आहे.
मास्क न लावणे व सामाजिक अंतर न राखणे अशा प्रकारांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.