Monday, January 13, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखएनसीबीवर एवढी चिखलफेक का?

एनसीबीवर एवढी चिखलफेक का?

वर्षभरापासून एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्जची एकापाठोपाठ एक प्रकरणे उजेडात आणली जात आहेत. एनसीबीचे नाव सर्वप्रथम चर्चेत आले ते अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर. सुशांतच्या मृत्यूची चौकशी करताना ड्रग्जची बाजूही समोर आली आणि बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन उघड झाले. तसे पाहिले तर, अमली पदार्थाच्या अंमलाखाली बॉलिवूडचे तारे-तारका आधीपासूनच होते. अगदी नावे घ्यायची झालीच, तर संजय दत्त आणि फरदीन खानचे घेता येईल. पण सुशांतचा तपास एनसीबीने हाती घेतल्यानंतर धक्कादायक नावे समोर येत गेली.

रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, अरमान कोहली, हीना पांचाळ, कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे सर्वजण एनसीबीसमोर हजर झाले. एनसीबीने केवळ चौकशी न करता, विविध ठिकाणी छापे टाकून अमली पदार्थांचे साठेही जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना देखील ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली.

आता हेच नवाब मलिक एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ एक आरोप करत सुटले आहेत. जावयाच्या अटकेनंतर नव्हे तर, सिनेअभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ड्रग्जप्रकरणी अटक केल्यानंतर ते आक्रमक झाले. मुंबईजवळच्या समुद्रात क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून एनसीबीने आर्यनसह सात जणांना अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना त्यात खोडा घालण्याचा प्रकार राज्यातील तिघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे. एनसीबीच्या तपास प्रक्रियेवर आक्षेप समजू शकतो. मात्र, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना वैयक्तिक स्वरूपात लक्ष्य करीत आहेत.छापा टाकून आर्यन खानसह इतर आरोपींना अटक करणे हा बनाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. समीर वानखेडेंनी ८ ते १० जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले असले तरी, प्रत्यक्षात ११ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातल्या ऋषभ सचदेव, प्रतीक गाबा, आमिर फर्निचरवाला या ितघांना सोडून देण्यात आले. त्यापैकी प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला या दोघांच्या बोलावण्यावरूनच आर्यन खान तिकडे गेला होता, असा दावा करतानाच, भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर ३ लोकांना सोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

फक्त महाराष्ट्र सरकारला आणि चित्रपटसृष्टीला बदनाम करण्यासाठी एनसीबी या कारवाया करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. वानखेडे दुबई व मालदीवला जाऊन बॉलिवूड कलाकारांकडून हप्ता वसुली करत होते, असा गंभीर आरोप वानखेडे यांनी केला आहे. भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर समीर वानखेडे यांची नोकरी एका वर्षात जाईल. त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. त्यांना जेलमध्ये जावे लागेल, असा दावा करेपर्यंत मलिक यांची मजल गेली.

तर दुसरीकडे समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांचे आरोप फक्त फेटाळलेच नाहीत, तर खोडूनही काढले. मी एक साधा सरकारी अधिकारी आहे. ड्रग्जचे सेवन तसेच त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई मी करतो. यावरून जेलमध्ये टाकत असतील, तर मी त्यांचे स्वागत करतो, असे सडेतोड उत्तरही त्यांनी दिले आहे.

एकूणच नवाब मलिक यांच्या या भूमिकेवरून अनेक प्रश्न उपस्थित होतात. सुशांतसिंह राजपूत मृत्यूनंतर एनसीबीचा तपास सुरू आहे. तेव्हा नवाब मलिक शांत होते. आर्यनच्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी एवढी आक्रमक भूमिका का घेतली? त्यांनी वारंवार पत्रकार परिषद घेत आपल्याकडे या सर्वांचे पुरावे आहेत, असे दावे केले. पण, हे पुरावे घेऊन न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी एकदाही सांगितले नाही. त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? आता राष्ट्रवादीचा एक दिग्गज नेता, माजी गृहमंत्री गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे पोलीस अधिकाऱ्यांना टार्गेट दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या नेत्याबद्दल मात्र नवाब मलिक मौन बाळगून आहेत.

न्यायालय आणि तपास यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करतील, हे जर राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य असेल, तर समीर वानखेडे यांच्याबद्दल मग दुजाभाव का? विशेष म्हणजे, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचा अन्य कोणताही नेता अवाक्षर देखील काढत नाही. ना मलिक यांचे समर्थन करत, ना समीर वानखेडेला लक्ष्य करत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी तर, मलिक आणि वानखेडेंचे प्रश्न मला विचारू नका. ते त्यांना विचारा, असे सांगून थेट हात झटकले. मला तेवढाच उद्योग नाही. इतरही भरपूर कामे आहेत, अशी टिप्पणी करून अजित पवार यांनी नवाब मलिक यांना तेवढाच उद्योग आहे, हे अधोरेखित करायचे होते का? एकूणच नवाब मलिक यांच्या या आक्रमकपणाचे बुमरँग होऊ शकते, याची काळजी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी घेतली पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -