Tuesday, December 10, 2024
Homeदेशमोदींकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक

मोदींकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक

लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नसल्याचा होता विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना देशातील कोरोना लसीकरणातील योगदानासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे भरभरून कौतुक केले. आरोग्य कर्मचारी देशवासीयांच्या लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नाहीत हे मला माहिती होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच भारतातील लसीकरण कार्यक्रमाच्या यशातून भारताची आणि सर्वांच्या प्रयत्नांची शक्ती दिसते, असेही नमूद केले आहे.

लसीकरण कार्यक्रमाच्या यशातून भारताची आणि सर्वांच्या प्रयत्नांची शक्ती दिसते. मला माझ्या देशातील नागरिकांच्या क्षमतेची पूर्ण कल्पना आहे. आरोग्य कर्मचारी देशवासीयांच्या लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नाहीत हे मला माहिती होतं. उत्तराखंडच्या पूनम नौटीयाल यांनी कोरोना लसीकरण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताने कायम जागतिक शांततेसाठी प्रयत्न केले

पुढील महिन्यात भारत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती देखील साजरी करेल. त्यांच्या जीवनातून आपल्याला स्वतःच्या संस्कृतीविषयी अभिमान बाळगणे, पर्यावरणाची रक्षा करणे, अन्यायाविरुद्ध लढणे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आज संयुक्त राष्ट्र दिवस देखील आहे. यानिमित्ताने भारताने जागतिक शांतता आणि जागतिक कल्याणासाठी दिलेलं योगदान आठवण्याची गरज आहे. भारताने कायमच जागतिक शांततेसाठी प्रयत्न केलेत. येत्या रविवारी (३१ ऑक्टोबर) सरदार पटेल यांची जयंती आहे. ‘मन की बात’च्या प्रत्येक श्रोत्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी लोहपुरुषाला नमन करतो. एकतेचा संदेश देणाऱ्या कोणत्या ना कोणत्या उपक्रमात सहभागी होणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

पोलीस दलात महिलांची संख्या वाढत आहे

पोलीस दलात महिलांची संख्या वाढत असल्याचेही यावेळी मोदींनी सांगितले. तसेच भारतात ड्रोनवर अनेक निर्बंध असल्याचं सांगत त्यांनी आता हे चित्र बदलत असल्याचे म्हटले. नवे ड्रोन धोरण चांगला परिणाम दाखवत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

स्वच्छतेची जबाबदारी स्वतःची समजली तरच कोरोनाविरुद्धच्या यश

नागरिकांनी स्वच्छतेची जबाबदारी स्वतःची समजली तरच याला यश येईल. त्यामुळे दिवाळीत आपल्या घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील यासाठी देखील प्रयत्न करा. स्वच्छता म्हटलं की, प्लास्टिकचा एकल वापरापासून मुक्तीची गोष्ट विसरून चालणार नाही. स्वच्छता अभियानातील उत्साह कमी होऊ देऊ नका. आपल्या सर्वांना मिळून देश पूर्णपणे स्वच्छ ठेवायचा आहे, असे मोदी यांनी सर्वांना आवर्जून सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -