मुंबई (प्रतिनिधी) : नायर रुग्णालयात लहान मुलांच्या कोवोवॅक्स लसीच्या चाचणीची निवड करण्यात आली होती. यानुसार नायर रुग्णालयात चाचण्या सुरू झाल्या; मात्र अद्यापही या चाचणीला पालकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ऑक्टोबर महिन्यात नायर रुग्णालयात २ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांची चाचणी सुरू झाली होती. सुरुवातीला ६ मुलांची यशस्वी ट्रायल करण्यात आली. त्यानंतर आता गेल्या १० दिवसांत १७ मुले चाचणीसाठी दाखल झाली आहेत. आतापर्यंत या चाचणीला कमी प्रतिसाद होता मात्र आता हळूहळू प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्ती केली जात आहे. त्यामुळे नायर रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या चाचणीत पालकांनी सहभाग घ्या, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत या चाचणीला कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र आता पालकांनी चाचणीला सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. चाचणीसाठी ९२० मुलांची नायर रुग्णालयाला आवश्यकता आहे. सद्यस्थितीत १० दिवसांत १७ मुले चाचणीसाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान हळूहळू ही संख्या वाढेल, असे म्हटले जात आहे.
महत्त्वाचं म्हणजे ऑगस्टमध्ये झायकोव्ह-डी नावाच्या लसीला सुरूवात झाली होती. मात्र त्यात केवळ १२ तरुण मुलांनीच सहभाग घेतला होता. यामुळे या लसीच्या तुलनेत कोवोवॅक्स लसीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या सिरो सर्वेक्षणानुसार ५० टक्के मुलांना कोविड विरुद्ध अँटीबॉडीज तयार झाली आहेत. यामुळे जास्त मुलांचा सहभाग सध्या नोंदवला जात नसला तरी लवकरच या ट्रायलला वेग येणार असल्याचे सांगितले जात आहे.