Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजहम सब भारतीय है

हम सब भारतीय है

चंद्रकांत बर्वे

आपण देशात ‘‘हिंदू, मुस्लीम’’ भाई-भाई… हम सब एक है… अशा अनेक प्रकारच्या घोषणा देत आलेलो आहोत… रेडिओ, टीव्ही किंवा पेपरमध्ये कोणत्याही प्रकारे जातीयवाद किंवा धर्मवाद आणून चालत नाही. हा राष्ट्रीय नितीचा भाग आहे आणि तो योग्यच आहे. कोणत्याही पार्टीचे सरकार आले तरी यात बदल संभवत नाही. आमच्या दूरदर्शनच्या कार्यक्रमातूनही कोणताही जातीय तणाव येणार नाही किंवा धर्मभेद वाढणार नाही याची काळजी आम्ही घेतच असतो.

मी गोव्यात असताना एक टेलिफिल्म लिहिली… ‘‘एका हाताची लढाई’’… हिंदू, मुस्लीम ऐक्याचा विषय… त्यासाठी काही कट्टर हिंदुत्ववादी व काही कट्टर मुस्लीम समुदाय नाट्याचा परिणाम वाढवण्यासाठी दाखवायचे होते. गोव्यात कलाकारांची कमी नाही. पण अनुषांगिक नेपथ्य, कपडेपट इतर सामग्रीचीही आवश्यकता होती. आम्ही तिथल्या सनातन संस्थेशी, तसेच काही हिंदू संघटना, मुस्लीम मौलवी आदींशी संपर्क साधला. दूरदर्शन या साधनसामग्री व कपडेपटांसाठी फीही देत असते. आता फक्त प्रश्न येतो तो सहकार्याचा. त्रिशूल, कमंडलू, चांगल्या मूर्ती, भगवे कपडे, तस्वीरी आदी हिंदू समुदाय दर्शक गोष्टी शूटिंगसाठी मिळवण्यासाठी, कोणत्याही हिंदू संघटनेचे लोक मात्र ‘मदत करू की’… पण घाई नाही. सावकाश. उद्या यांना भेटा…परवा इकडे या…. वगैरे पद्धतीने! पण मुस्लीम! त्यांना जेव्हा पटले की ही टेलिफिल्म दूरदर्शन बनवत आहे, त्यात अँटीमुस्लीम मेसेज असणार नाही, त्यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य केले. एक वस्तू मागायचा अवकाश, चार वस्तू मिळत होत्या. त्यांचा कट्टरपणा मदत करताना देखील दिसून आला. पुढे मी गुलबर्ग्यात असताना मात्र याच्या नेमका उलट अनुभव आला. आम्हाला हैदराबाद मुक्ती संग्रमावर एक डॉक्युमेंटरीसाठी काही भागाचे मला नाट्ययीकरण करायचे होते. निजामाच्या काळात निजामाचे जय हो करणारी प्रार्थना सर्व शाळेतून विद्यार्थ्यांना म्हणावी लागायची. तेव्हा क्रांतिकारकांनी त्याचबरोबर ‘‘वंदे मातरम्’’ म्हणायला सुरुवात केली.

या घटनेचे चित्रीकरण करायचे होते. १९४० चे दशक त्यात दाखवायचे असल्याने, एक त्या काळची वाटेल अशी उर्दू शाळा आम्ही आमचा ड्रायव्हर मुनीरखानच्या मदतीने शोधून काढली. मी त्या शाळेच्या प्रिन्सिपॉलना भेटून सर्व काही सांगितले. आम्ही दूरदर्शनतर्फे चांगलं पेमेन्ट देखील करणार होतो.

त्या गरीब शाळेला त्या पैशाचा मुलांसाठी चांगला उपयोग करता आला असता. संपूर्ण तयारीनिशी आम्ही निघणार तोच मला फोन आला की, शाळा मुलांकडून शूटिंगसाठी निजामाची प्रार्थना म्हणायला तयार आहे; परंतु ‘वंदे मातरम्’ म्हणायला त्यांचा विरोध आहे. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रिन्सिपल बाई व इतर काही शिक्षक ‘वंदे मातरम्’मधला ‘व’ सुद्धा म्हणायला तयार नव्हते. मग काय ऐनवेळी मला शूटिंग कॅन्सल करावे लागले आणि तो सीन डॉक्युमेन्टरीतून कमी करावा लागला.

आम्ही जेव्हा एखादी डॉक्युमेन्टरीतून गोष्ट दाखवतो ती सर्वांना पटायला हवी. यासाठी आम्ही ऑब्जेक्टिव आहोत असे नुसते सांगून चालत नाही. ते प्रेक्षकांनाही वाटायला हवेच! त्यामुळे मला माझ्या कार्यक्रमात हिंदू अभ्यासकांबरोबर मुस्लीम अभ्यासकांचेही मत या वृत्तचित्रासाठी हवे होते. पण मुस्लीम अभ्यासक निजामाच्या विरुद्ध किंवा वल्लभभाई पटेल किंवा रामानंद तीर्थ यांच्याविषयी चांगले बोलायला अजिबात राजी दिसत नव्हते.

त्यांची मानसिकता अजूनही निजामाच्या काळातीलच होती. त्यांना आपण भारतीय संघ राज्यात असल्याचे दुःख होत असावे, पण उघडपणे ते आपल्या देशाला विरोध करत नव्हते, एवढाच काय तो फरक. याचाच फायदा घेऊन मी त्यांना कॅमेरापुढे खूप बोलते केले. त्यांच्या भाषणाच्या २० मिनिटांतून राष्ट्रीय एकतेला पूरक असे कसेबसे एक दीड मिनीट शोधून मी माझी डॉक्युमेन्टरी पूर्ण केली. पण एक मात्र खरे की, पडद्यावर दिसणारे चित्र आणि आजचे वास्तवातील चित्र यात तफावत आहे. हे मला अनुभवातून पटलेले आहे. प्रेक्षकांनाही ‘‘दूरदर्शनवाले जरी असे दाखवत असले तरी प्रत्यक्षात हे चित्र काही अगदी असे नाही’’ हे समजत असत. कारण आपण सगळेच ढोंगी आहोत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असते. असाच अनुभव मला गोव्यात एक डॉक्युमेन्टरी करताना आला. गोव्यावर पोर्तुगीजांचे अन्यायी राज्य होते, पण शेवटचा पोर्तुगीज गव्हर्नर vassal e Silva मात्र चांगला लोकप्रिय होता. त्याने १९६१ साली गोवा मुक्तिसंग्रामाच्या वेळी पोर्तुगीज सरकारचा युद्ध करण्याचा आदेश पाळला नाही व अनावश्यक रक्तपात टाळला. पोर्तुगीज सरकारने त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला, पण गोवा राज्य सरकारने मात्र त्यांचा यथावकाश उचित सत्कार केला. त्याच्यावर डॉक्युमेन्टरी करण्याचे आम्ही ठरवले. माजी कुलगुरू Dr Olineo Gomes या पोर्तुगीज भाषा जाणणाऱ्या अभ्यासकाची लेखनासाठी निवड केली.

पण ते त्यांच्या संहितेत पोर्तुगीजांचे गोडवे गाऊ लागले. पोर्तुगीज देश सोडून गेले याचे त्यांना झालेले दुःख सारखे आम्हाला जाणवत होते. त्यामुळे मला त्यांच्या स्क्रिप्टमध्ये खूप बदल करावे लागले. ‘एका विद्वानाचे स्क्रिप्ट तुम्ही बदलताय’ असे म्हणून ते माझ्यावर खूप नाराज झाले, पण माझा नाईलाज होता. मला खात्री आहे, त्यांनी आम्हा दूरदर्शन अधिकाऱ्यांना खूप शिव्या घातल्या असणार. चालायचंच.

csbarve51@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -