Sunday, August 31, 2025

भारतीयांचे सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी घटले!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाने जगभरात थैमान घातले. भारतातही दोन लाटेत अनेकांचे मृत्यू झाले. तर, अनेक जण सुदैवाने बचावले. कोरोना महामारीला दोन वर्षे होत असून त्याचे दूरगामी परिणामही आता दिसू लागले आहेत. कोरोना काळात अर्थात गेल्या साधारणपणे दोन वर्षांमध्ये देशातील नागरिकांचं सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी घटले आहे. मंबईतल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीजने (आयआयपीएस) हा अभ्यास केला असून त्यांनी नुकताच आपला अहवाल जाहीर केला आहे.

कोेरोनाच्या साथीचे देशभरातील मृत्यूदरावर कशा प्रकारे परिणाम झाले, याचा अंदाज घेण्यासाठी आयआयपीएसकडून हा अभ्यास करण्यात आला होता. या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे त्याचा देशाच्या सरासरी आयुर्मानावर काय परिणाम झाला, याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला. यासाठी ग्लोबल बर्डन डिसीज स्टडी आणि कोविड इंडिया अॅप्लिकेशन प्रोग्रामच्या पोर्टलवरून माहितीचा वापर करण्यात आल्याचे आयआयपीएसकडून स्पष्ट करण्यात आले.

या अभ्यासातील निष्कर्षांनुसार, कोरोना काळात देशातील सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी कमी झाल्याचे दिसले. त्यामुळे आता भारतातील सरासरी आयुर्मान हे २०१९मध्ये होते, तितके झाल्याचा दावा देखील संस्थेकडून करण्यात आला आहे. कोरोनाच्या आधी भारतातील सरासरी आयुर्मान पुरुषांसाठी ६९.५ वर्ष इतके होते. तेच आता ६७.५ वर्षं अर्थात दोन वर्षांनी घटल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. त्यासोबतच, महिलांसाठी जे आयुर्मान ७२ वर्ष होते, ते आता ६९.८ वर्ष अर्थात २ वर्षं चार महिन्यांनी घटले आहे. आयआयपीएसचे असिस्टंट प्रोफेसर सूर्यकांत यादव यांचा हा स्टडी बीएमसी पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये छापून आला आहे.

मृतांमध्ये पुरुष अधिक

या अभ्यासातून हे देखील समोर आले आहे की, कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या पुरुषांमध्ये प्रामुख्याने ३५ ते ६९ वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. सरासरी आयुर्मान घटण्यामध्ये या वयोगटात झालेले मृत्यू प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment