मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशी रेल्वे स्थानकादरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी तिन्ही मार्गांवर ब्लॉक असल्याने पर्यायी मार्गावर विलंबाने लोकल धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर (मुख्य मार्ग) ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकलफेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वेवर पनवेल-वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटी दिशेला सुटणाऱ्या आणि सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल-ठाणे दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन आणि नेरुळ-खारकोपर दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी या लोकलफेऱ्या सुरू राहतील.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेतील जलद लोकलफेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकलफेऱ्या रद्द होतील. तर काही लोकल विलंबाने धावणार आहेत.