Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाध्वज विजयाचा उंच धरा रे!

ध्वज विजयाचा उंच धरा रे!

विजयाबद्दल १३५ कोटी भारतीयांचा ठाम विश्वास

भारत- पाकिस्तान लढत आज

सुनील सकपाळ

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील मॅचमध्ये कोण जिंकणार, हा प्रश्न कुठल्याही सच्चा क्रिकेटप्रेमीला सतावत नाही. टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या पहिल्या ‘संडे स्पेशल’ लढतीत विराट कोहलीचा संघ जिंकेल, असा ठाम विश्वास देशातील १३५ कोटी जनतेला आहे.

भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमधील लढत म्हणजे जगभरातील चाहत्यांसाठी मोठी पर्वणी. या दोन तुल्यबळ संघांना पाच वर्षांनंतर एकमेकांशी झुंजताना पाहण्याची संधी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरू झालेल्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेने उपलब्ध करून दिली आहे. कोरोना साथीनंतरच्या ‘अनलॉक’ प्रत्येक घडामोडीची प्रत्येकाला उत्सुकता आहे.

जागतिक क्रीडा स्पर्धा पाहता टोक्यो ऑलिम्पिकनंतर यूएईतील टी-ट्वेन्टी वर्ल्डकपने क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. वर्षभराने पुढे ढकलले गेले तरी टोक्योमध्ये भारताने वैयक्तिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केली. तीच संधी यूएईत पाच वर्षांनी होत असलेल्या वर्ल्डकपच्या माध्यमातून विराट कोहली आणि सहकाऱ्यांना चालून आली आहे.

भारताच्या नावावर दोन वनडे वर्ल्डकप(१९८३ आणि २०११) आणि एक टी-ट्वेन्टी वर्ल्डकप (२००७) आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्यावहिल्या टी-ट्वेन्टी विश्वचषकावर भारताने नाव कोरले तरी त्यानंतर २०१४ वगळता जेतेपदाच्या जवळ पोहोचता आलेले नाही. वास्तविक पाहता यूएईत सुरू असलेला वर्ल्डकप भारतात होणार होता. मात्र, कोरोनामुळे बीसीसीआयला त्यांच्या यजमानपदाखालील परदेशात विश्वचषक आयोजित करावा लागत आहे. त्यामुळे, भारताच्या दृष्टीने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपला मोठे महत्त्व आहे. कुठल्याही स्पर्धेत पहिली मॅच खूप महत्त्वाची असते. त्यातच पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करायचे म्हटल्यानंतर क्रिकेटपटूंसह चाहत्यांमध्ये वाढता जोश आहे. कोरोना निर्बंध काही प्रमाणात कायम असल्याने चाहते उघडपणे त्यांचा आनंद व्यक्त करू शकत नाही. मात्र, भारताला पाकिस्तानशी दोन हात करताना कधी एकदा पाहतो, असे क्रिकेटशौकिनांना झाले आहे.

भारताचे क्रिकेटपटू वर्ल्डकपूर्वी, आयपीएलमध्ये खेळलेत आणि ही टी-ट्वेन्टी लीगही यूएईत झाली आहे. त्यात कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा तसेच रिषभ पंत, ईशान किशन, सूर्यकुमार यादव यांनी चमकदार कामगिरी केली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव लढतीत ‘आयपीएल इफेक्ट’ दिसला. प्रत्यक्ष स्पर्धेतही त्याची पुनरावृत्ती होईल, हे नक्की.

प्रतिस्पर्धी संघ कितीही तुल्यबळ असला तरी इतिहास आपल्या बाजूने आहे. सध्याचा फॉर्म पाहता भारताला विजयाची सर्वाधिक संधी आहे. ‘जिंकून जिंकून जिंकणार कोण, भारताशिवाय आहेच कोण’ याच घोषणांनी रविवारची रात्र दणाणून निघणार, हे लक्षात ठेवा. सीमेवर असो किंवा क्रिकेटच्या मैदानात, भारतच जिंकणार, असा विश्वास सर्वांना आहे. देशवासियांचा विश्वास आपले क्रिकेटपटू नक्कीच सार्थ ठरवतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -