भारत-पाकिस्तान लढतीकडे जगभराचे लक्ष
दुबई (वृत्तसंस्था) : आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये गटवार साखळीतील (ब गट) सलामीच्या लढतीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. फायनल पूर्वीचा फायनल म्हणून या सामन्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे, भारत-पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
भारताने दोन्ही सराव सामन्यांत बाजी मारली आहे. इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाला सहज हरवून टीम इंडियाने प्रॅक्टिसचा पुरेपूर फायदा उठवला आहे. जवळपास सर्वच प्रमुख क्रिकेटपटू तसेच दुसऱ्या फळीतील बॅटर्सनी फॉर्म दाखवल्याने अंतिम संघ निवडीचे मोठे आव्हान संघ व्यवस्थापनासमोर आहे.
सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलचा भन्नाट फॉर्म भारताच्या फलंदाजीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कर्णधार विराट कोहली अपेक्षित फलंदाजी करत नाही. मात्र, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, ईशान किशन , हार्दिक पंड्याने संधीचे सोने केले आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि शार्दूल ठाकूरमुळे फलंदाजीत डेप्थ आहे. जसप्रीत बुमरासह आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाने सातत्य राखल्याने गोलंदाजी सर्वसमावेशक आहे.
पाकिस्तानने प्रॅक्टिस मॅचमध्ये गतविजेता वेस्ट इंडिजवर मात केली. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सांघिक कामगिरी ढेपाळली. भारताविरुद्ध त्यांनी अंतिम अनुभवी शोएब मलिकसह मोहम्मद हफीझचा समावेश केला आहे. पाकिस्तानची फलंदाजीची भिस्त कर्णधार बाबर आझमसह फखर झमन, मोहम्मद हफीझ आणि शोएब मलिकवर आहे. शाहीन शाह आफ्रिदीसह शादाब खानवर गोलंदाजीची मदार आहे.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (राखीव यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमन, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वासिम, शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली, हॅरिस रौफ, हैदर अली.
प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखण्यास कोहलीचा नकार
भारताचा कर्णधार विराट कोहली प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखण्यास तयार नाही. पाकिस्तान संघात असे अनेक खेळाडू आहेत जे सामन्याला कलाटणी देऊ शकतात. त्यामुळे माझ्यासह सर्व क्रिकेटपटूंना जबरदस्त खेळ करावा लागेल, असे कोहलीने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सलामीच्या लढतीपूर्वी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले. पाकिस्तानचा संघ मजबूत आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल. यावेळीही पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम खेळ नक्कीच दाखवू, असा विश्वास त्याने व्यक्त केला. पाकिस्तानने संघाची घोषणा केली आहे. मात्र, आदल्या दिवशी संघाची घोषणा करण्यास कोहलीने असहमती दर्शवली.
दुबईमध्ये १४३ धावा
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम फलंदाजीला अनुकूल असते. येथे झालेले ६२ टी-ट्वेन्टी सामने पाहता सरासरी धावसंख्या १४३ इतकी आहे. मात्र, गेल्या काही सामन्यांत पाठलाग करणाऱ्या संघाला यश मिळत आहे. आजवरचे सामने पाहता पाठलाग करताना २७ वेळा विजयाची नोंद झाली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला २४ वेळा विजय मिळाला आहे. तसेच एक सामना टाय झाला आहे.
सलग पाचव्या विजयाची संधी
मागील पाच लढतींचा निकाल पाहिल्यास भारताने ४-१ अशी मोठी आघाडी घेतली आहेत. त्यात सलग चार विजयांचा समावेश आहे. सातत्य राखल्यास भारताला विजयी पंचकाची संधी आहे.
एक हजार कोटींचा सट्टा; भारताला ५७ ते ५८ रुपये दर
भारत-पाकिस्तान लढतीसाठी एक हजार कोटींचा सट्टा लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सट्टेबाजीत भारत सामना जिंकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाणेफक झाल्यानंतर सट्टा लावणाऱ्यांचे प्रमाण वाढेल आणि एकूण सट्टा १५०० ते २००० कोटींचा लावला जाण्याची शक्यता आहे. दुबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बुकी उपस्थित आहे. सट्टेबाजीत भारताला ५७ ते ५८ रुपये दर लावल्याचे एका बुकीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ऑनलाइन बेटिंग साईट्सच्या माध्यमातूनही सट्टा लावला जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी सध्या दुबई आणि अबुधाबीमध्ये आहेत. ते सर्व सामन्यांवर नजर ठेऊन आहे.
भारताचे तीन क्रिकेटपटू माघारी
दुबई : बीसीसीआयने भारतीय संघाच्या शिबिरात सहभागी असलेल्या चार क्रिकेटपटूंना मायदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शाहबाज नदीम, कृष्णप्पा गौतम, करन शर्मा आणि व्यंकटेश अय्यर यांचा समावेश आहे.
टी-ट्वेन्टी विश्वचषक पाहता बीसीसीआयने आठ नेट गोलंदाजांची निवड केली होती. यूएईहून परतलेले हे चारही गोलंदाज देशांतर्गत स्पर्धेचा भाग म्हणून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील. या चार गोलंदाजांच्या आगमनानंतर उम्रान मलिक, आवेश खान, हर्षल पटेल आणि लुकमन मेरीवाला यांना संघासोबत कायम ठेवण्यात आले आहे. विश्वचषकादरम्यान बीसीसीआयने वेगवान गोलंदाजांना नेट गोलंदाज म्हणून अधिक महत्त्व दिले आहे. सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी स्पर्धा ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
वर्ल्डकप आणि अर्थकारण
टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळल्या जाणाऱ्या ३९ सामन्यांसाठी बीसीसीआयने अमिरात क्रिकेट बोर्डाला ५२.१६ कोटी रुपये मोजले आहेत. बीसीसीआयला या विश्वचषकाचे आयोजन करून ८९.४२ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. पैशांचा हा व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये केला जाईल. टी-२० वर्ल्डकप विजेत्या संघासाठी किती रकमेचं बक्षीस ठेवण्यात आले, याची घोषणा आयसीसीने केली आहे. पुरुषांच्या टी-ट्वेन्टी विश्वचषक विजेत्या संघाला आयसीसीकडून १.६ मिलियन डॉलर्स (जवळपास १२ कोटी रुपये) इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. त्याच वेळी, उपविजेत्या संघाला म्हणजेच अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाला ८ लाख डॉलर्स (जवळपास ६ कोटी रुपये) इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. सुपर १२ फेरीनंतर प्रत्येक विजयासाठी संघाला बोनस पुरस्कारही दिला जाईल. २०१६ मध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाप्रसंगीही असेच झाले होते. सुपर -१२ फेरीमध्ये एकूण ३० सामन्यांमध्ये ४० हजार डॉलर्स (सुमारे १ कोटी २० लाख रुपये)ची बक्षिसं दिली जातील. या जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी ४ लाख अमेरिकन डॉलर (सुमारे ३ कोटी रुपये) मिळतील.
या वेळी विश्वचषकात सहभागी झालेल्या संघांना एकूण ५.६ दशलक्ष डॉलर (सुमारे ४२ कोटी रुपये) अदा करण्यात आले आहेत. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होत आहेत. सुपर १२ स्टेजपर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक संघाला ७० हजार डॉलर्स (५२ लाख रुपये) दिले जातील. राऊंड लीगच्या १२ सामन्यांच्या दरम्यान प्रत्येक सामन्यासाठी ४० हजार डॉलर्स दिले जातील. राऊंड-१ मधून बाहेर पडलेल्या चार संघांना ४०-४० हजार डॉलर्स (सुमारे ३० लाख रुपये) मिळतील.
या स्पर्धेसाठीची तिकिटे विकण्याचा अधिकार अमिरात क्रिकेट बोर्डालाही आहे. ही तिकिटे विकून मिळालेले पैसेही अमिराती क्रिकेट बोर्डाकडे राहतील. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात बीसीसीआयला चांगला नफा होण्याची शक्यता आहे. या विश्वचषकातून सुमारे ९० कोटींचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा संपूर्ण खर्च ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनासाठी लागलेल्या खर्चापेक्षा १८६.२८ कोटी रुपयांनी कमी आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-ट्वेटी विश्वचषक २०२२ स्पर्धा आयोजित केली जाईल.
आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन स्तरांना मान्यता देते. पण, टी २० ला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. कारण त्याचा वेग प्रसारक आणि जाहिरातदारांना आकर्षित करतो. यामुळे आयसीसीने आता जागतिकीकरणाला आदर्श मानायला सुरुवात केली आहे. जितके अधिक देश सहभागी होतील तितके जास्त पैसे येतील. तसंच, ऑलिम्पिकमध्ये या खेळाचे पुनरागमन घडवण्याचा दावा अधिक मजबूत होईल. १९०० मध्ये फक्त एकदाच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्या वेळी ब्रिटनने सुवर्णपदक जिंकलं होतं, हे फार कमी लोकांना माहीत असेल. – चिन्मय प्रभू
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स