Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणनिकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही

निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही

उंबर्डे – फोंडा रस्ता दुरुस्ती कामाच्या शुभारंभावेळी नितेश राणे यांचा इशारा

वैभववाडी (प्रतिनिधी) : दुरवस्थेमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या उंबर्डे – फोंडा रस्ता डागडुजी कामाला सुरुवात होत आहे. या रस्त्याचे काम दर्जेदारपणे करून घेण्याची जबाबदारी ही स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांची आहे. निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही. अशी कामे होत असतील तर ती तात्काळ थांबवा, अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी उपस्थित नागरिकांना दिल्या.

उंबर्डे – फोंडा रस्ता डागडुजी कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, राजेंद्र राणे, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, प्राची तावडे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, किशोर दळवी, आबा दळवी, संताजी रावराणे, संजय सावंत, रज्जब रमदुल, बाबालाल लांजेकर, उमर रमदुल, उदय मुद्रस, दशरथ दळवी, सुनील भोगले, प्रकाश पाटील, तसेच कार्यकारी अभियंता शेवाळे, उपकार्यकारी अभियंता कांबळे, कनिष्ठ अभियंता सुतार, दुडिये, ठेकेदार व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

उंबर्डे – फोंडा हा रस्ता सर्वांसाठी चर्चेचा विषय राहीला आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याने चालणे देखील मुश्कील झाले आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी एकूण ६ कोटींचा निधी मंजूर आहे. परंतु कोरोना काळात अनेक अडचणीमुळे हे काम थांबले होते. प्रत्येक बैठकीत काम मंजूर आहे इतकं उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात होते.

या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची रस्ते दुरवस्थेबाबत बैठक घेतली. या बैठकीत नासीर काझी, भालचंद्र साठे व राजेंद्र राणे यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लक्ष वेधले. दरम्यान शेवाळे यांनी निधी मंजूर आहे. लवकरच काम सुरू होईल असे तोकडे उत्तर दिले. आमदार नितेश राणे यांनी थेट अधिकाऱ्यांना भुमीपूजनाची तारीख व वेळ दिली. त्यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली. उंबर्डे येथे हा भूमिपूजन सोहळा पार पडला. काम कधी पासून सुरू करणार? असा प्रश्न नितेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार यांना केला. १० नोव्हेंबर पासून काम सुरू करणार असल्याचे ठेकेदार सुधाकर साळुंखे व देवानंद पालांडे यांनी सांगितले.

यावेळी उंबर्डे ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -