आजची शिवसेना बाळासाहेबांची नव्हे…!

Share

अरुण बेतकेकर

मातोश्रीवर पदाधिकारी पोहोचत. काही बाळासाहेबांना, तर काही उद्धवजींना भेटण्यासाठी. बाळासाहेबांना भेटण्यास आलेल्यांना ‘बौद्धिक’ दिले जाई. कशासाठी बाळासाहेबांना भेटण्याची गरज आहे, आता ते दैनंदिन कामकाजात लक्ष घालत नाहीत, त्यामुळे ते निर्णयही घेत नाहीत, आता सर्व काही उद्धवजींच्या हाती आहे, तुम्हाला कसे कळत नाही, असेच चालले तर उद्धवजींना ते आवडणार नाही, तुमच्यासारखी कर्तृत्ववान पदाधिकाऱ्यांची शिवसेनेला गरज आहे, तुमचं भवितव्य त्यांच्याच हाती आहे, त्यांना साथ द्या, त्यांचे हात बळकट करा, असे झाल्यासच आपली प्रगती होऊ शकेल वगैरे, वगैरे. अशा प्रकारे मातोश्रीवर धमकीवजा ब्रेनवॉशिंग केले जाई. हा प्रयोग माझ्याबाबतही अनेकदा घडला. विभागातील विश्वासातील पदाधिकाऱ्यांद्वारे सुद्धा हाच एक कलमी कार्यक्रम राबविला जात असे. थोडक्यात काय तर, बाळासाहेबांना एकाकी पाडण्याचे षडयंत्र खुद्द मातोश्रीवरच राबविले जात होते आणि या कटकारस्थानात जे कोणी सहभागी होते, ते आजच्या शिवसेनेत प्रमुखपदी आरूढ झाले आहेत आणि बाळासाहेबांना सर्वस्वी मानणारे माझ्यासारखे असंख्य, विजनवासात नाहीसे झाले. दुर्दैवाने हे सारे आजूबाजूला घडताना बाळासाहेबांना हतबल होऊन ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवावे लागले.

उद्धवजींनी आपल्या समर्थकांस शिवसेनेत महत्त्वाच्या पदावर विराजमान करण्यास सुरुवात करत, सत्तेचे स्वतःच्या हाती केंद्रीकरण करण्याची रणनीती अवलंबली. एक-एका व्यक्तीकडे अनेक पदे बहाल करण्यात येऊ लागली. सत्ता उद्धवजींच्या हाती एकवटू लागली. यातील मेख बाळासाहेबांच्या लक्षात आली नसती तरच नवल. त्यांनी जाहीरपणे याची वाच्यता करत यापुढे ‘एक व्यक्ती एक पद’ अशी शिवसेनेची रचना असेल, असे सूतोवाच केले. यामागील त्यांचा दृष्टिकोन विशाल होता. पक्षात उपलब्ध असलेल्या इच्छुक व पात्र व्यक्तींना सामावून घेत सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे व त्याचे विस्तारीकरण करण्याचे निश्चित केले. यातून पक्षाचे कार्य अधिक प्रभावी होणे, हा त्यामागील स्तुत्य हेतू होता, पण उद्धवजींनी या निर्णयास केराची टोपली दाखवली. आजही त्यांनी आपल्याच विश्वासातील लोकांना म्हणजेच मातोश्रीतील शीतयुद्धात बाळासाहेबांची प्रतारणा करत स्वतःस हातभार लावला, अशा व्यक्तींना महत्त्वाची पदे तीही, एकेकाला ४ – ५ पदे बहाल करत सत्ता आपल्या हाती समेटून ठेवली आहे. यात ज्येष्ठता, कौशल्य व बुद्धिमतेला वाव नाही. वाव आहे तो स्वतःशी एकनिष्ठ राहिलेल्या व्यक्तींना. हे एक आजच्या शिवसेनेच्या दुर्दैवी स्थितीस व अधोगतीस कारणीभूत ठरते आहे. या कारस्थानाचे सूत्रधार सुभाष देसाई. या कारस्थानाबरोबरच पक्षातील अर्थकारण, तेही अगदी पदे व उमेदवारांच्या सौद्यांचेही, ते हाताळत असतात. म्हणूनच बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी शिवसेना उभी केली त्यातील हयात असलेल्या नेत्यांतील सुभाष देसाई हे असे एकमेव नेते जे उद्धवजींच्या बरोबर आजही कार्यरत आहेत, तेही स्वतः एकही निवडणूक न जिंकता.

शिवसेनेतील दोन देसाई, यांनी उच्छाद मांडला आहे. सुभाष देसाई हे सूत्रधार तर अनिल देसाई हे हेर, तो ही महत्त्वाकांक्षी हेर. संगत साधून स्वकीयांच्या पाठीवर वार करत, चुगल्या करत, कपोलकल्पित खोटेपणा करत लायकी नसूनही, स्वतः चार – पाच पदांवर बैठक टाकून स्थानापन्न झाले आहेत. ‘बडे देसाई तो बडे देसाई, छोटे देसाई सुभान अल्लाह’ असे कपाळावर हात बडवून म्हणण्याची अवस्था आज शिवसेनेतील हतबल पदाधिकाऱ्यांची झाली आहे.

पुढे-पुढे बाळासाहेब विजनवासात जात असल्याची परिस्थिती निर्माण होत गेली. त्यांच्या भेटीगाठी दुर्मीळ होत गेल्या, प्रसिद्धी माध्यमापासून त्यांना दूर ठेवण्यात येऊ लागले, त्यांच्यापासून दूरध्वनी सुद्धा दुरावत गेला. पण ठरावीक विषयावर बोलण्यासाठी, ठरावीक व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी, ठरावीक निर्णय जाहीर करण्यासाठी त्यांना हेतुपुरस्सर पुढे आणले जाई. हे चाणाक्ष शिवसैनिकांच्या लक्षातही येई. अनेक वेळा प्रसारमाध्यमांत उद्धवजी स्वतः त्यांच्या बाजूला बसून त्यांच्या कानात सूचना करताना दिसत. दसरा मेळाव्यासारख्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या दिवशी सुद्धा त्यांना नजरकैदेत राहावे लागे. जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा बाळासाहेब या परिस्थितीविषयी आपल्या विश्वासातील लोकांसमोर खंत व्यक्त करत असत, त्यातीलच मी एक.

त्यांची ढासळती प्रकृती आणि त्यांच्या खाण्या-पिण्याविषयी सुद्धा चर्चा होत असे. या घटना कालांतराने अशा अनुभव घेतलेल्या लोकांद्वारे जनतेसमोरही आल्या आहेत. स्वतःचे मृत्यूपत्र, व्यवस्थापक, विश्वस्त, त्याच्याशी संबंधित इतर, यांच्याविषयी सुद्धा बाळासाहेब आपल्या भावना व्यक्त करत असत. यातीलच एक अनिल परब. पण हेच अनिल परब आज शिवसेनेत असंख्य पदांवर आरूढ असून क्रमांक दोनचे नेते म्हणून निर्णय प्रक्रियेत मिरवत आहेत.

वरील सत्य परिस्थिती, पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे यांच्या विश्लेषणावरून आजची शिवसेनाही नक्की कोणाची, हे वाचकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. उदाहरणादाखल सांगतो, शिवसेनेच्या मूळ ध्येय धोरणास आणि बाळासाहेबांच्या सर्वमान्य विचारसरणीस तिलांजली देत घेतले गेलेले उद्धवजींचे सर्वच निर्णय गुमान शिरसावज्ञ ठरतात. अगदी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी झालेली महाविकास आघाडी कोणताच विरोध न होता सहजी गळी उतरली. बाळासाहेब अशा तडजोडीवर थुंकले असते. सत्याचा एक गुणधर्म असतो. सत्याला जेवढे दाबण्याचा प्रयत्न होईल, त्याच्या दुप्पट ताकदीने ते उसळून बाहेर येते. त्यानुसार अशा घटना बाहेर पडत राहणार.

बाळासाहेब काही आश्वासने शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार देत असत. कालांतराने हतबल, निष्प्रभ, शक्तिहीन झाल्याने, इच्छा असूनही अशी आश्वासने त्यांना पूर्ण करता आली नाहीत. अशा ठरावीक पदाधिकाऱ्यांसाठी बाळासाहेब निरोप पाठवत. आपल्या विश्वासातील शिवसेना नेत्यांच्या द्वारे असे होत असे. प्रमोद नवलकरांनी मला सांगितलेली ही घटना. बाळासाहेबांनी मला माझ्या कर्तृत्वाची आणि शिवसेनेला दिलेल्या योगदानाच्या समर्थनार्थ विधान परिषदेवर आमदारकी देण्याचे आश्वासन १९९४ – ९५मध्ये शिवसेना नेते व काही पदाधिकाऱ्यांसमक्ष दिले होते. २-३ वेळा प्रयत्न करूनही यात त्यांना यश आले नव्हते. शेवटी त्यांच्यासाठी जेव्हा हे अशक्य असल्याची जाणीव झाली, तेव्हा त्यांनी शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांच्याद्वारे मला निरोप धाडला होता.

(लेखक, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे (संलग्न शिवसेना) माजी सरचिटणीस आहेत)

Recent Posts

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

8 minutes ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

10 minutes ago

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…

48 minutes ago

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

1 hour ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

2 hours ago