Saturday, October 25, 2025
Happy Diwali

लोकलमध्ये गर्दी वाढली!

लोकलमध्ये गर्दी वाढली!

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल लोकडाऊनमध्ये गेले कित्येक महिने बंद होती, त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र आता दीड वर्षांनंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकलची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद होता. मात्र लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना आता लोकल प्रवास सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकलमधील गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर ६० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. कोरोनापूर्व रोज मध्य आणि पश्चिम मार्गावर ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. त्याप्रमाणे सध्याची लोकल प्रवासाची संख्या ८० टक्क्यांवर पोहोचली आहे.

सध्या मध्य रेल्वेवर ३२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत, तर पश्चिम रेल्वेवर २७ ते ३० लाख प्रवासी प्रवास करत आहेत. लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या सुमारे २२ लाख प्रवाशांनी मासिक पास घेतले आहेत. यामुळे ही गर्दी सध्या वाढत आहे, तर काहीजण ज्यांनी केवळ एकच लस घेतली असून दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान लोकलमध्ये गर्दी वाढत असली तरी कोरोना प्रतिबंधक नियम पाळायचे आहेत. मात्र गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंन कसे पाळले जाणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना असला तरी मास्क वापरणे बंधनकारक असून, न वापरल्यास दंड आकारला जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले

Comments
Add Comment