Tuesday, July 1, 2025

मलिक यांचे आरोप बिनबुडाचे; कायदेशीर कारवाई करणार

मलिक यांचे आरोप बिनबुडाचे; कायदेशीर कारवाई करणार

समीर वानखेडेंचे थेट आव्हान; देशसेवेसाठी तुरुंगातही जाईन




मुंबई (प्रतिनिधी) : आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केले आहे. त्यामुळे, याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वानखेडेंच्या पोस्टींगबद्दल मलिक यांनी आरोप केले होते. आता, एनसीबीने हे आरोप फेटाळले असून प्रेसनोट जारी केली आहे. तर, समीर वानखेडे यांनीही आरोप फेटाळत, देशसेवेसाठी तुरुंगात जायलाही तयार असल्याचे म्हटले आहे.


वानखेडे यांनीही सांगितले की, नवाब मलिक खोटारडे आहेत. मी मुंबईतील पोस्टींगसाठी २०१९ मध्ये अर्ज केला होता, हे प्रकरण त्याआधीचे आहे. नुकतेच एनसीबीने पत्रक जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, खंडणी, एक्स्टॉर्शन हे अतिशय खालच्या पातळीचे शब्द आहेत. मी मालदीवला गेलो होतो, पण सरकारची परवानगी घेऊनच गेलो होतो. मी माझ्या कुटुंबासमवेत तिथे गेलो होतो, त्यास ते खंडणी म्हणत असतील तर ते योग्य नाही.


‘मंत्री मलिक यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी छोटासा सरकारी नोकर आहे, ते मोठे मंत्री आहेत. जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्जविरोधी काम करण्यासाठी ते मला तुरुंगात टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, असेही समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. वानखेडे यांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळत त्यांना चॅलेंज दिले आहे. तसेच, गेल्या १५ दिवसांपासून माझ्या दिवंगत आईबद्दल, सेवानिवृत्त वडिलांबद्दल, माझ्या बहिणीबद्दल त्यांनी अतिशय गलिच्छ भाषा वापरली, ते वैयक्तीक टीका करत आहेत. त्यामुळे, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्ला-मसलत करुन कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment