Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमोदी है, तो मुमकीन है...

मोदी है, तो मुमकीन है…

लसीकरणाचा विश्वविक्रम

संपूर्ण जगाचा रहाटगाडा रोखून धरणाऱ्या आणि लाखो जीवांचा बळी घेऊन जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या महासंहारक अशा कोरोना महामारीचे संकट जेव्हा देशावर कोसळले तेव्हा सर्वजण हबकून गेले होते. या भयाण विषाणूला आळा कसा घालायचा, त्याचा बेधडक सुरू असलेला संसर्ग रोखायचा कसा? असे नानाविध प्रश्न तज्ज्ञ मंडळींसोबतच सर्वांसमोर आ वासून उभे ठाकले होते. जगात नवख्या असलेल्या या विषाणूवर परिणामकारक असे औषधही कुठे उपलब्ध नव्हते. त्यातच चीनमधून उत्पत्ती पावलेला हा भयाण विषाणू युरोपच्या अनेक देशांमध्ये संहार घडवून आपल्या देशातही आला आणि सगळेच गोंधळून गेले. या भीषण संकटाचा धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना प्रथम धीर दिला आणि या संकटाशी सर्वांनी एकदिलाने लढण्याचा मंत्र दिला. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनी तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांची महत्त्वाची बैठक बोलवून कोरोनाला रोखण्याचा एक ॲॅक्शन प्लान तयार केला आणि कोरोनाला रोखायचेच, असा चंग बांधून तशा सूचना सर्व संबंधितांना दिल्या.

कोरोनाला रोखायचे असेल, तर परिणामकारक अशी नवी लस शोधून काढायला हवी, हे जाणून जगभरातील शास्त्रज्ञ कसोशीने प्रयोगाला लागले. पंतप्रधान मोदींनीही आपल्या संशोधकांना, औषध कंपन्यांना लस विकसित करण्याच्या सूचना दिल्या आणि आश्चर्य म्हणजे पुण्याच्या अदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटला यशही प्राप्त झाले. त्यानंतर हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीलाही कोरोना विरोधी लस विकसित करण्यात यश मिळाले. आता कोरोनाला रोखायचे असेल आणि देशभरातल्या नागरिकांमधील प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर लसीकरणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, याची पुरेपूर जाण असलेल्या मोदींनी या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात लस उत्पादनाचे आदेश दिले. त्यासाठी आवश्यक असणारी सरकार पातळीवरील आणि इतरही सर्व मदत त्यांना देऊ केली. आता लस उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाले असले तरी संपूर्ण देशवासीयांचे लसीकरण करणे ही बाब अतिशय कठीण होती. मात्र न डगमगता मोदींनी हे धनुष्यबाण उचलण्याचे धारिष्ट्य दाखविले. त्यांनी या कामात सर्वात महत्त्वाच्या अशा डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच अन्य आरोग्यसेवकांना काम फत्ते करण्याची हाक दिली आणि सर्वांनीच या महान कार्यात स्वत:ला झोकून दिले. भारतासारख्या विशाल, मोठी लोकसंख्या असलेल्या देशात नागरिकांचे लसीकरण करताना या आरोग्य सेवकांनी, आशादूत आदींनी दिवस – रात्र झटून काम केले त्याचे फार मोठे फलित गुरुवारी प्राप्त झाले आणि कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताने एक ऐतिहासिक यश प्राप्त केले.

देशात लसीकरणाच्या आकड्याने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि एकच जल्लोष झाला. जगभरांतून देशाचे आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक केले जात आहे. भारताने १०० कोटींचा टप्पा पार केला असताना अन्य देशात मात्र अजूनही ५० कोटीही लसीकरण पूर्ण झालेले नाही. बलाढ्य अमेरिकेत केवळ ४१.०१ करोड लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ ब्राजिलमध्ये २६.०२ कोटींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. हा क्षण केंद्रातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या धामधुमीत साजरा केला जात आहे. ज्या व्यक्तीने १०० कोटीवी लस घेतली ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदार संघाची रहिवासी आहे. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात अरुण रॉय यांना लसीचा १०० कोटीवा डोस देण्यात आला. रॉय हे दिव्यांग आहेत. अत्यंत जलद गतीने लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा गाठणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. गेल्या १०० वर्षांत आलेल्या सर्वात मोठ्या महामारीशी दोन हात करण्यासाठी आता देशाकडे १०० कोटी लसींच्या डोसचे मजबूत सुरक्षा कवच आहे. हा क्षण ‘उल्लेखनीय यश’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यानिमित्त लाल किल्ल्यावर सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकावत या क्षणाला ऐतिहासिक महत्त्व देण्यात आले. या तिरंग्याची लांबी २२५ फूट असून रुंदी १५० फूट आहे. या राष्ट्रध्वजाचे वजन जवळपास १४०० किलो आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी मोदींनी देशभरातील आरोग्यसेवकांचे, नागरिकांचे आभार मानले आणि कौतुकही केले. त्यासोबतच देशभरातील सर्व रेल्वे स्थानक, बस स्थानक, प्रमुख ठकाणं अशा सार्वजनिक ठिकाणीही १०० कोटी लसींचे डोस पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनीही देशाला लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि समर्थ नेतृत्वाचे हे फळ आहे, याबाबत दुमत नाही. बुधवारपर्यंत लसीकरणाने एकूण ९९.७ कोटींचा टप्पा गाठला होता. त्यात ७५ टक्के ज्येष्ठांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ३१ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आता लवकरच उर्वरित नागरिकांचे लसीकरण होणे बाकी असून ते उद्दिष्टही सहज साध्य होईल, कारण ‘मोदी है तो सब मुमकीन है’ यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -